अहमदाबाद: अहमदाबादमध्ये घडलेल्या एअर इंडिया विमान दुर्घटनेतील अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स (Black Box) सापडला आहे. या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं असताना आता या दुर्घटनेचं नेमकं कारण जाणून घेण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे.
ब्लॅक बॉक्स सापडला
या अपघातानंतर शोध मोहीम राबवण्यात आली होती. त्यामध्ये फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर, म्हणजेच ब्लॅक बॉक्सपैकी एक सापडल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. दुसरा ब्लॅक बॉक्स अद्याप सापडलेला नसून त्यासाठी शोधमोहीम सुरूच आहे. ब्लॅक बॉक्स दिल्लीतील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. त्यामधून अपघाताच्या आधीच्या क्षणांची माहिती मिळू शकते.
हेही वाचा: Air India Emergency Landing: एअर इंडिया फ्लाइटला बॉम्बची धमकी? फुकेट-दिल्ली एअर इंडिया फ्लाइटची आपत्कालीन लँडिंग
ब्लॅक बॉक्सचे महत्त्व काय?
ब्लॅक बॉक्स म्हणजे दोन स्वतंत्र उपकरणं एक फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) आणि दुसरं कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (CVR). एफडीआरमध्ये विमानाची उंची, वेग, दिशा, इंजिनचा वेग अशा अनेक तांत्रिक बाबींची नोंद असते. तर सीव्हीआरमध्ये पायलट्समधील संभाषण, अलार्म साउंड्स, आणि कोणत्याही इमर्जन्सी कॉल्सची ध्वनिफीत असते. या दोन्ही उपकरणांच्या सहाय्याने अपघात होण्यामागचं खरे कारण शोधण्यास मदत होते.
ब्लॅक बॉक्स तपासणीतून काय समजणार?
या अपघातातील ब्लॅक बॉक्स तपासणीमधून विमानाच्या उड्डाणादरम्यान काय घडलं, पायलट्सकडून कोणते निर्णय घेण्यात आले, तांत्रिक अडचणी होत्या का, याची माहिती मिळणार आहे. विशेषतः टेकऑफच्या काही क्षणांतच अपघात घडल्यामुळे, या काही सेकंदांची माहिती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता का, की मानवी चूक कारणीभूत होती, हे सर्व तपासणीतून स्पष्ट होईल.
हेही वाचा: Ahmedabad Plane Crash: विमान कोसळण्यापूर्वी पायलटने शेवटचा कॉल कुणाला केला?