बंगळुरू: बंगळुरू येथे एका सॉफ्टवेअर कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कार्यरत असलेल्या राकेश खेडेकरने (Rakesh Khedekar) आपल्या पत्नी गौरी सांबरेकरची (Gauri Sambarekar) निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोघांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते आणि काही महिन्यांपूर्वीच ते बंगळुरूला स्थलांतरित झाले होते. मात्र, त्यांच्यात सतत वाद होत होते आणि या वादांनी शेवटी हिंसक रूप धारण केले.
राकेश आणि गौरीमध्ये अनेकदा वाद होत असत. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी दोघांची समजूतही घातली होती, पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. 26 मार्च 2025 रोजी पुन्हा एकदा दोघांमध्ये मोठा वाद झाला. गौरी मुंबईला परत जाण्याचा आग्रह धरत होती, मात्र नुकतेच फ्लॅटचे डिपॉझिट भरले असल्याने राकेशला ते शक्य नव्हते. या वादाच्या नशेत गौरीने चाकू उगारून राकेशला धमकावले आणि भांडी फेकून मारली. या सगळ्याचा संताप राकेशच्या मनात साठत गेला आणि क्षणिक संतापाच्या भरात त्याने चाकूने हल्ला करून गौरीचा जीव घेतला.
हेही वाचा: म्यानमारध्ये भूकंपाचा तडाखा! भूकंपात 144 बळी, 30 लाख विस्थापित
गौरीचा मृत्यू झाल्यावर घाबरलेल्या राकेशने तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ते सुटकेसमध्ये भरले. त्यानंतर त्याने मुंबईतील आपल्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. घाबरून तो खाजगी वाहनाने मुंबईकडे रवाना झाला, मात्र वाटेतच त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. झुरळ मारायचे औषध पिऊन बेशुद्ध पडला. शिरवळजवळ तो बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. तपास सुरू होताच पोलिसांना संपूर्ण सत्य समजले आणि त्यांनी राकेशला अटक केली.
गौरीच्या कुटुंबीयांनी यापूर्वीच तिच्या स्वभावामुळे या लग्नाला विरोध केला होता. तिचा स्वभाव रागीट असल्याचे आणि ती भांडणात आक्रमक होत असल्याचे त्यांनी सांगितले. “आम्ही चार वर्षे त्यांच्या लग्नाला विरोध केला, पण ते ऐकायला तयार नव्हते. त्यांनी एकमेकांशिवाय लग्न करणार नाही, असे ठरवले होते,” असे गौरीच्या पालकांनी सांगितले.