नवी दिल्ली: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताच्या तपासासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. लंडनच्या गॅटविक विमानतळासाठी उड्डाण करणाऱ्या बोईंग 787-8 ड्रीमलाइनरच्या ब्लॅक बॉक्सचे मोठे नुकसान झाले आहे, ज्यामुळे भारतात डेटा काढणे अशक्य झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्लॅक बॉक्स आता विश्लेषणासाठी यूएस नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) च्या वॉशिंग्टन लॅबोरेटरीमध्ये पाठवला जाणार आहे.
तांत्रिकदृष्ट्या कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (सीव्हीआर) आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर (एफडीआर) या दोन वेगवेगळ्या उपकरणांचा समावेश असलेला अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्स विश्लेषणासाठी वॉशिंग्टन डीसी येथील राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाच्या मुख्यालयात पाठवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 12 जून रोजी अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या 36 सेकंदात एअर इंडियाचे विमान AI-171 कोसळले. या अपघातात 241 प्रवासी आणि 10 क्रू मेंबर्ससह 274 लोकांचा मृत्यू झाला. विमान जवळच्या मेघनी नगरमधील एका मेडिकल कॉलेजच्या वसतिगृह आणि निवासी इमारतींना धडकले. अपघातापूर्वी, पायलट कॅप्टन सुमित सभरवाल यांनी मेडे कॉल केला होता, जो अपघाताचा शेवटचा संदेश होता.
हेही वाचा - इंडिगो फ्लाइटमध्ये अडकले भूपेश बघेल! 30 मिनिटे दरवाजा न उघडल्याने उडाला गोंधळ
अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स -
अपघाताच्या दोन दिवसांनंतर अपघाग्रस्त विमानाचा कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) म्हणजेच ब्लॅक बॉक्स सापडला होता. तथापि, अपघातानंतर लागलेल्या आगीमुळे आणि मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीमुळे, भारतात त्यांचा डेटा मिळवणे शक्य झाले नाही. तज्ञांचे म्हणणे आहे की ब्लॅक बॉक्स उड्डाणाच्या शेवटच्या क्षणांबद्दल माहिती देऊ शकतो, जसे की उंची, वेग आणि कॉकपिटमधील संभाषण, जे अपघाताचे कारण जाणून घेण्यासाठी महत्त्वाचे ठरेल.
हेही वाचा - अहमदाबाद विमान अपघातातील 190 मृतदेहांची DNA ओळख पटली! आतापर्यंत 157 मृतदेह कुटुंबियांना सुपूर्द
दरम्यान, भारताच्या एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ने तपास सुरू केला आहे. या तपास यंत्रणेत अमेरिका, युके आणि बोईंगचे तज्ञ देखील समाविष्ट आहेत. एअर इंडियाचे विमान विमानतळाच्या ईशान्य सीमेजवळील बीजे मेडिकल कॉलेज हॉस्टेल कॉम्प्लेक्समध्ये कोसळले. या अपघातात विमान प्रवाशांव्यतिरिक्त जमिनीवर असलेले 33 जण मृत्युमुखी पडले. तथापी केवळ 11ए मध्ये बसलेला एक ब्रिटिश-भारतीय व्यक्ती या अपघातातून बचावला.