नवी दिल्ली: पावसाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी आज लोकसभेचे कामकाज सकाळी 11 वाजता सुरू होताच विरोधकांनी जोरदार गोंधळ घालायला सुरुवात केली. प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच विरोधी खासदारांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला संतप्त झाले. त्यांनी कामकाज थेट 12 वाजेपर्यंत तहकूब केले. राज्यसभेचे कामकाजही याच कारणास्तव तहकूब करण्यात आले.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्पष्ट शब्दांत विरोधकांची कानउघडणी केली. त्यांनी विचारले की विरोधक आता ऑपरेशन सिंदूरवर चर्चा का टाळत आहेत, ज्या विषयावर मागील सात दिवसांपासून ते आंदोलन करत होते? प्रश्नोत्तराचा तास हा सरकारची जबाबदारी निश्चित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो, मग तो चालू द्यायचा नसेल तर लोकशाही प्रक्रियेवरच प्रश्न उपस्थित होतो, असे बिर्ला यांनी यावेळी ठणकावून सांगितले.
हेही वाचा - पंतप्रधान मोदींची मालदीव भेट! 4,850 कोटींची आर्थिक मदत आणि लष्करी सहकार्याची घोषणा
इंडिया अलायन्सचा निषेध
कामकाज सुरू होण्यापूर्वी इंडिया अलायन्सच्या नेत्यांनी संसद परिसरात निषेध आंदोलन केले. बिहारमध्ये सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष गहन सुधारणा (SIR) प्रक्रियेविरोधात हा निषेध होता. त्यांनी आरोप केला की या प्रक्रियेद्वारे अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि अल्पसंख्याकांच्या नावांची नोंद त्यांच्या संमतीशिवाय वगळली जात आहे, आणि हे लोकशाहीवरील थेट आक्रमण आहे.
हेही वाचा - सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता 30 दिवसांची रजा घेऊनही मिळणार पूर्ण पगार
या निषेधात सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, अखिलेश यादव, प्रियांका गांधी वाड्रा, मीसा भारती, मनोज झा यांसारखे अनेक वरिष्ठ नेते सहभागी झाले होते. हातात फलक घेऊन त्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या.