Saturday, August 16, 2025 08:37:00 PM

ऑनलाइन बेटिंग अॅप्सना प्रोत्साहन दिल्याप्रकरणी ED ची Google आणि Meta वर कारवाई

याप्रकरणी 21 जुलै रोजी दोन्ही कंपन्यांच्या प्रतिनिधींना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने या दोन्ही कंपन्यांना नोटीस पाठवल्या आहेत.

ऑनलाइन बेटिंग अॅप्सना प्रोत्साहन दिल्याप्रकरणी ed ची google आणि meta वर कारवाई

नवी दिल्ली: भारतातील दोन आघाडीच्या टेक कंपन्यांवर गुगल आणि मेटावर अंमलबजावणी संचालनालय (ED) ने कारवाईचा बडगा उगारला आहे. दोन्ही कंपन्यांनी बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग अॅप्सना जाहिरातीतून प्रोत्साहन दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी 21 जुलै रोजी दोन्ही कंपन्यांच्या प्रतिनिधींना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने या दोन्ही कंपन्यांना नोटीस पाठवल्या आहेत.

बेकायदेशीर बेटिंग अॅप्सना प्रोत्साहन दिल्याचा आरोप - 

केंद्रीय तपास यंत्रणेने ऑनलाइन बेटिंग अॅप्सद्वारे मनी लाँड्रिंग आणि हवाला व्यवसाय यासारख्या गंभीर आर्थिक गुन्ह्यांबद्दल चौकशीसाठी गुगल आणि मेटाच्या प्रतिनिधींना बोलावले आहे. ईडी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, या दोन्ही कंपन्यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर बेकायदेशीर बेटिंग अॅप्सच्या जाहिरातीला प्रोत्साहन दिले आहे. गुगल आणि मेटावर आरोप आहे की त्यांच्यामुळे बेटिंग अॅप्स अधिकाधिक वापरकर्त्यांपर्यंत पोहोचले आहेत.

हेही वाचा - अ‍ॅपलला मोठा धक्का! BOE डिस्प्ले असलेल्या आयफोनवर बंदी; 'हे' मॉडेल्स बाजारातून हद्दपार

29 सेलिब्रिटीविरुद्ध गुन्हा दाखल - 

गेल्या आठवड्यात, ईडीने बेटिंग अॅप्सचा प्रचार केल्याबद्दल 29 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, ज्यामध्ये टीव्ही आणि चित्रपट कलाकार, सोशल मीडिया प्रभावकार आणि सेलिब्रिटींचा समावेश आहे. ईसीआयआरने प्रकाश राज, राणा दग्गुबाती आणि विजय देवरकोंडा यांसारख्या मोठ्या दक्षिणेकडील कलाकारांची नावे देखील नोंदवली आहेत. या सेलिब्रिटींवर मोठ्या बेटिंग अॅप्सना प्रोत्साहन देण्याचा आरोप आहे.

हेही वाचा - OMG! एलोन मस्कच्या शाळेत एका तासाची फी 1.88 लाख रुपये

याआधीही महादेव बेटिंग अॅप्स घोटाळ्याबाबत ईडीने मोठी कारवाई केली होती. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनाही बेटिंग अॅप्सद्वारे 6 हजार कोटी रुपयांच्या प्रकरणात आरोपी बनवण्यात आले होते. माजी मुख्यमंत्र्यांवर अ‍ॅपच्या प्रवर्तकांकडून 500 कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे. याशिवाय, फेअरप्ले आयपीएल बेटिंग अॅप्स प्रकरणातही ईडीने कारवाई केली होती. ईडी 21 जुलै रोजी मेटा आणि गुलच्या प्रतिनिधींची चौकशी करेल. त्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल.
 


सम्बन्धित सामग्री