नवी दिल्ली: सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यादरम्यान, यावेळी अधिवेशनात अनेक महत्त्वाचे मुद्दे सभागृहात चर्चेला येत आहेत. सध्या लोकसभेत भाषा विषयक एक वेगळाच वाद उफाळून आला आहे. हिंदी भाषेत बोलण्यास सांगितल्यावर द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) पक्षाचे खासदार अंदिमुथु राजा यांनी आपल्या ठाम भूमिकेने सभागृहाचे लक्ष वेधले. ए. राजा यांनी म्हटलं की, 'मला हिंदी येत नाही, तरीही मी भारतीय आहे. जर तुम्हाला हे मान्य नसेल, तर आम्ही येथून निघून जाण्यास तयार आहोत.' त्यांच्या या विधानाने सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
खासदार ए. राजा कोण आहेत?
अंदिमुथु राजा तामिळनाडूतील निलगिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. ते DMK पक्षाचे उपसरचिटणीसही आहेत. त्यांचा राजकीय प्रवास 1996 पासून सुरू झाला. त्यांनी केंद्र सरकारमध्ये विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. 1996-2000 मध्ये ते ग्रामीण विकास राज्यमंत्री होते. तसेच 2000-2004 मध्ये त्यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली.
हेही वाचा - राज्यसभेत 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चा! राजनाथ सिंह म्हणाले, 'भारत दहशतवादाविरुद्ध कोणत्याही थराला जाण्यास तयार'
2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील सहभाग
ए. राजा यांचे नाव 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात पुढे आले होते. या प्रकरणात त्यांच्यावर दूरसंचार मंत्रालयाचा गैरवापर करून खाजगी कंपन्यांना फायदा करून दिल्याचा आरोप होता. त्यामुळे त्यांना 2011 मध्ये तिहार तुरुंगातही जावे लागले. मात्र, या प्रकरणात त्यांची नंतर निर्दोष मुक्तता झाली.
हेही वाचा - दहशतवाद्यांना शिक्षा मिळेपर्यंत ऑपरेशन सिंदूर अपूर्ण; पहलगाम हल्ल्यावरून सुप्रिया सुळे संतप्त
दरम्यान, 2025 च्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात 21 जुलैपासून झाली. हे अधिवेशन 21 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. एकूण 32 दिवसांच्या कालावधीत 21 संसद बैठकांचे आयोजन होणार आहे. सध्याच्या घडामोडी पाहता हे अधिवेशन प्रचंड गोंधळाचे आणि चर्चास्पद ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.