नवी दिल्ली: भारत सरकारने पाकिस्तानच्या विमानांसाठी आपल्या हवाई क्षेत्रावरील बंदी आणखी एका महिन्यासाठी वाढवली आहे. आता ही हवाई बंदी 24 ऑगस्ट 2025 पर्यंत लागू करण्यात आली आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान हवाई क्षेत्रावरील बंदी 30 एप्रिलपासून लागू करण्यात आली होती.
NOTAM आदेशाचा कालावधी वाढवला
नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मंगळवारी आपल्या एक्स पोस्टमध्ये सांगितले की, भारतीय हवाई क्षेत्रात पाकिस्तानी विमानांच्या प्रवेशावर बंदी घालणारी 'NOTAM' अधिकृतपणे 23 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सरकारने पाकिस्तानविरुद्ध उचललेल्या विविध पावलांचा एक भाग म्हणून ही बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयामागे सुरक्षा प्रोटोकॉल व धोरणात्मक कारणांचा आधार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा -उद्यापासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू; महागाई, भ्रष्टाचारासह ''या'' मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरणार
दरम्यान, सुरुवातीला ही बंदी 24 मे पर्यंत होती, जी प्रथम 24 जून, नंतर 24 जुलै आणि आता 24 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली. नवीन NOTAM 23 ऑगस्ट रोजी UTC वेळेनुसार रात्री 23:59 पर्यंत लागू राहील, म्हणजेच ती 24 ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 5:30 पर्यंत लागू राहील. तथापी, पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी त्यांच्या हवाई क्षेत्रावरील बंदी 24 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे.
हेही वाचा - पहलगामच्या हल्ल्यासंदर्भात मोठा खुलासा! पाकिस्तानच्या ''या'' दहशतवादी संघटनेचे सदस्य होते हल्लेखोर
हवाई वाहतुकीवर प्रभाव -
भारत सरकारने 24 एप्रिल रोजी सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर पाकिस्तानने भारतीय विमानांना त्यांच्या हवाई क्षेत्रातून उड्डाण करण्यास 24 मे पर्यंत बंदी घातली होती. ही बंदी प्रथम 24 जून, नंतर 24 जुलै आणि आता आणखी एका महिन्यासाठी वाढवण्यात आली आहे. या परस्पर बंदीमुळे दोन्ही देशांमधील हवाई वाहतुकीवर प्रभाव पडत आहे. व्यापारी, मालवाहतूक आणि प्रवासी विमानसेवा यावर या निर्णयाचा मोठा परिणाम होत असून, भविष्यात या तणावामुळे आणखी निर्बंध लादले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.