Who is Nimisha Priya: भारतीय नागरिक निमिषा प्रियाला 16 जुलै रोजी येमेनमध्ये फाशी देण्यात येणार आहे. येमेन सरकारने यासाठी तयारी सुरू केली आहे. येमेनचे राष्ट्रपती रशाद अल-अलीमी यांनी निमिषाला देण्यात आलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेला मान्यता दिली होती. सध्या निमिषा हिची आई गेल्या एक वर्षापासून तिच्या मुलीला वाचवण्यासाठी येमेनमध्ये तळ ठोकून आहे. निमिषा प्रिया कोण आहे? आणि तिच्यावर काय आरोप आहेत ते जाणून घेऊयात.
निमिषा प्रियावर काय आरोप आहेत?
निमिषा गेल्या अनेक वर्षांपासून येमेनमध्ये राहत असताना एक क्लिनिक चालवत होती. 2017 मध्ये निमिषा हिच्यावर तिचा व्यावसायिक भागीदार तलाल अब्दो मेहदी याचा खून केल्याचा आरोप करण्यात आला होता, त्यानंतर तिला तिथल्या पोलिसांनी अटक केली होती. असे म्हटले जाते की अनेक वर्षे खटला चालल्यानंतर तिच्यावरील आरोप सिद्ध झाले. यानंतर, येमेनच्या कायद्यानुसार, न्यायालयाने तिला फाशीची शिक्षा सुनावली आहे. निमिषा हिला 16 जुलै रोजी फाशी देण्यात येणार आहे. यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे.
हेही वाचा - डोनाल्ड ट्रम्प यांनी आता 'या' 14 देशांवर लादला कर; म्यानमारकडून आकारले सर्वाधिक शुल्क
निमिषा प्रिया कोण आहे?
निमिषा प्रिया ही मूळची भारतातील केरळ राज्यातील कोची जिल्ह्यातील आहे. तिची आई प्रेमा कुमार कोचीमध्ये मोलकरीण म्हणून काम करायची. निमिषा 19 व्या वर्षी 2008 मध्ये येमेनला गेली. तीन वर्षांनंतर निमिषा परत आली आणि तिने ऑटो ड्रायव्हर टॉमी थॉमसशी लग्न केले. त्यानंतर थॉमसही निमिषासोबत येमेनला गेला. दरम्यान, निमिषा एका मुलीची आई बनली. तिची मुलगी आता 13 वर्षांची आहे.
नर्स निमिषा प्रियाने येमेनमध्ये तिचे क्लिनिक उघडले. मिळालेल्या माहितीनुसार, तिची येमेनमधील अब्दो महदी नावाच्या एका पुरूषाशी मैत्री झाली. महदीने तिला क्लिनिक उघडण्यास मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, महदीने आपले वचन पाळले नाही. यानंतर महदीने निमिषाला त्रास देण्यास सुरुवात केली. तो तिला त्याची दुसरी पत्नी म्हणू लागला. त्याने निमिषाकडून वारंवार पैसे मागितले. निमिषाने याबद्दल पोलिसांकडे तक्रारही केली, त्यानंतर महदीला काही दिवस तुरुंगात राहावे लागले. मात्र, महदी तुरुंगातून परत आल्यावर त्याने निमिषा यांचा पासपोर्ट ताब्यात घेतला.
हेही वाचा - 26/11 Mumbai Attack: तहव्वुर राणाने उघडलं तोंड! पाक सैन्याशी असलेल्या संबंधाचा केला खुलासा
भूल देण्याच्या इंजेक्शनमुळे घडला मोठा अनर्थ -
दरम्यान, महदीकडून पासपोर्ट परत मिळवण्यासाठी निमिषाने त्याला भूल देण्याचे इंजेक्शन दिले. परंतु भूल देण्याच्या इंजेक्शनचा डोस ओव्हरडोसमध्ये बदलला आणि महदीचा मृत्यू झाला. त्यानंतर निमिषाने तिच्या सहकारी हनानसह महदीच्या शरीराचे तुकडे केले आणि त्याचा मृतदेह पाण्याच्या टाकीत फेकून दिला. हनान हा येमेनी नागरिक आहे.
निमिषा प्रियाला मृत्युदंडाची शिक्षा -
या प्रकरणात निमिषाला 2018 मध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती, तर हनानला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. येमेनच्या ट्रायल कोर्टाने निमिषा प्रियाला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. त्यानंतर, सर्वोच्च न्यायालयानेही ही शिक्षा कायम ठेवली. निमिषा यांच्या वकिलाने राष्ट्रपतींकडे मृत्युदंड माफ करण्यासाठी अर्ज केला होता. राष्ट्रपती रशाद-अल-अलीमी यांनी तो फेटाळून लावला आणि मृत्युदंड कायम ठेवला.