Sunday, June 15, 2025 12:54:05 PM

व्यापाऱ्यांनी शिकवला तुर्कीला धडा! तुर्की सफरचंदांऐवजी काश्मिरी सफरचंद खरेदी करण्याचा घेतला निर्णय

राजस्थानमधील अजमेरमध्ये तुर्कीहून येणाऱ्या सफरचंद आणि किवींवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिला.

व्यापाऱ्यांनी शिकवला तुर्कीला धडा तुर्की सफरचंदांऐवजी काश्मिरी सफरचंद खरेदी करण्याचा घेतला निर्णय
Boycott Turkey
Edited Image

अजमेर: भारत-पाकिस्तानमधील तणाव आता कमी झाला आहे. परंतु, त्याचा परिणाम अजूनही दिसून येत आहे. राजस्थानमधील अजमेरमध्ये तुर्कीहून येणाऱ्या सफरचंद आणि किवींवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. राजस्थानमधील अजमेर येथील सफरचंद व्यापारी अर्जुन यांनी सांगितलं की, 'भारत-पाकिस्तान तणावानंतर, तेथून येणाऱ्या सफरचंद आणि किवींवर पूर्णपणे बंदी आहे. तुर्कीयेहून येणाऱ्या इतर कोणत्याही फळांवरही बंदी घातली जाईल. तुर्की सफरचंदांऐवजी लोक काश्मिरी सफरचंद खरेदी करत आहेत.' भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिला. त्यामुळे आता संगमरवरी आणि फळ व्यापाऱ्यांनी तुर्कीयेसोबतचे त्यांचे व्यवसाय थांबवले आहेत.

भारत-तुर्कीचे संबंध तणावपूर्ण - 

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिला. हा पाठिंबा अनेक स्वरूपात दिसून आला, जसे की तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांचे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी फोनवरून संभाषण, पाकिस्तानला ड्रोन आणि शस्त्रास्त्रांचा पुरवठा आणि काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानच्या भूमिकेला पाठिंबा. तुर्कीने 'ऑपरेशन सिंदूर'चा निषेध केला आणि जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याची आंतरराष्ट्रीय चौकशी करण्याच्या मागणीला पाठिंबा दिला.

हेही वाचा - ट्रम्प तुर्कीला 304 दशलक्ष डॉलर्सची क्षेपणास्त्रं देणार; Boycott Turkey नंतर अमेरिकेविरोधात देशात ही मागणी

तुर्की आणि पाकिस्तानमध्ये मैत्रीपूर्ण संबंध -  

तुर्की आणि पाकिस्तानमध्ये खोल ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक संबंध आहेत. दोन्ही देश मुस्लिम बहुल आहेत. तुर्की पाकिस्तानला इस्लामिक जगात एक महत्त्वाची लष्करी आणि अणुशक्ती मानतात. तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगान यांना इस्लामिक जगात नेतृत्व प्रस्थापित करण्याची आणि माजी ऑट्टोमन साम्राज्याच्या वारशाचा फायदा घेण्याची महत्त्वाकांक्षा आहे. अणुशक्ती असलेला पाकिस्तान या धोरणात एक महत्त्वाचा भागीदार आहे.

हेही वाचा - भारताच्या या मित्राने दिली शत्रूला साथ! पाकिस्तानची अर्थव्यवस्था 50 वर्षांसाठी मजबूत होणार?

काश्मीर बाबत तुर्कीचा पाकिस्तानला पाठिंबा - 

दरम्यान, काश्मीर मुद्द्यावर तुर्कीने नेहमीच पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे. एर्दोगान यांनी काश्मीरबाबत भारताच्या धोरणांवर टीका केली. तसेच ते पाकिस्तानसोबतच्या त्यांच्या भूमिकेच्या जवळ असल्याचे म्हटले. सध्या तुर्की आणि भारत यांच्यातील संबंध तणावपूर्ण आहेत. अनेक व्यापाऱ्यांनी आता तुर्कीतून आयात होणाऱ्या वस्तूंवर बंदी घातली आहे. 
 


सम्बन्धित सामग्री