Sunday, August 17, 2025 12:37:37 AM

Rice Facts: भात खाल्ल्यामुळे डायबिटीज होतो? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला आणि योग्य आहाराचा मंत्र

भात खाल्ल्यामुळे डायबिटीज होत नाही, मात्र प्रमाण, वेळ आणि भाजी-डाळीसोबत खाल्ल्यास आरोग्यास फायदेशीर ठरतो. भात टाळण्यापेक्षा संतुलित आहार व योग्य जीवनशैली ठेवावी.

rice facts भात खाल्ल्यामुळे डायबिटीज होतो जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला आणि योग्य आहाराचा मंत्र

Rice Facts: आपल्या रोजच्या आहारात भाताचे स्थान महत्त्वाचे आहे. वरणभात, भाजीभात किंवा साधा तांदळाचा भात प्रत्येक घरात वेगवेगळ्या स्वरूपात तो असतोच. मात्र सध्याच्या काळात डायबिटीजचा वाढता धोका पाहता अनेकजण भाताबद्दल संभ्रमात आहेत. अनेक लोक भात खाणं पूर्णपणे टाळतात, तर काहीजण फक्त रात्रीच्या जेवणात भात न खाण्याचा निर्णय घेतात. पण हा निर्णय आरोग्यासाठी योग्य आहे का?

भात आणि डायबिटीज; खरी गोष्ट काय आहे?
भातामध्ये मुख्यत्वे कार्बोहायड्रेट्स असतात, जे शरीराला ऊर्जा देण्यासाठी आवश्यक असतात. मात्र पांढऱ्या तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) जास्त असल्याने तो शरीरात लवकर साखरेत बदलतो. त्यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढण्याचा धोका निर्माण होतो. पण याचा अर्थ असा नाही की, भात खाल्ल्यामुळे थेट डायबिटीज होतो.

डॉक्टरांच्या मते, भात हा पूर्णपणे वर्ज्य अन्नपदार्थ नाही. योग्य प्रमाणात व योग्य पद्धतीने भात खाल्ल्यास त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होत नाही. उलट, भात हा ऊर्जा देणारा व पचायला सोपा असलेला अन्नघटक आहे.

हेही वाचा: Sugar Withdrawal: साखर खाणं बंद करणार आहात? थांबा! हे 5 गंभीर दुष्परिणाम आधी वाचा…नाहीतर पश्चात्ताप होईल

फक्त भात नको, संतुलित आहार हवे

डायबिटीज टाळण्यासाठी किंवा नियंत्रणात ठेवण्यासाठी, केवळ भातावर भर न देता, जेवणात इतर पोषणमूल्य असलेल्या घटकांचा समावेश करणे गरजेचे आहे. भातासोबत भरपूर भाजी, डाळी, कोशिंबीर, तूप अशा पदार्थांचा समावेश केला, तर भातामुळे होणारी रक्तातील साखरेची वाढ नियंत्रित ठेवता येते.

फायबरयुक्त भाताचा पर्याय निवडा

पांढऱ्या तांदळाऐवजी ब्राउन राईस, लाल तांदूळ किंवा हँडपाउंड राईस निवडल्यास फायबरचे प्रमाण वाढते. फायबरमुळे अन्न हळूहळू पचते आणि साखरेची पातळी नियंत्रित राहते. त्यामुळे अशा प्रकारचे तांदूळ मधुमेहींनी आणि वजन नियंत्रण करू इच्छिणाऱ्यांनी प्राधान्य द्यायला हवेत.

भात खाण्याची योग्य वेळ व प्रमाण ठरवा

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, भात खाण्यासाठी दिवसाची वेळ देखील महत्त्वाची असते. सकाळी किंवा दुपारी भात खाल्ल्यास तो शरीराने सहज पचवला जातो. मात्र रात्रीच्या वेळी शरीराचा मेटाबॉलिझम कमी असतो, त्यामुळे रात्री भात खाणं टाळावं. तसेच एका वेळी १ वाटी किंवा त्यापेक्षा कमी भात घेणं उत्तम.

हेही वाचा: Fruits to avoid during monsoon: पावसाळ्यात 'ही' 5 फळ खाणं आहे धोकादायक; जाणून घ्या

भात पूर्ण टाळण्याऐवजी समजून घ्या

भात म्हणजे डायबिटीजचा शत्रू असा गैरसमज अनेकांच्या मनात आहे. मात्र भात हा दोष नसून, आपण तो किती, कसा आणि केव्हा खातो यावर सगळं अवलंबून आहे.

डायबिटीज टाळण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला:

-भातासोबत प्रथिने आणि फायबरयुक्त पदार्थ घ्या

-तळलेले व जास्त तेलकट पदार्थ टाळा

-रात्रीच्या जेवणात भात टाळा

-दिवसात भाताचं प्रमाण मर्यादित ठेवा

-व्यायाम व चालणे यांचा आहारासोबत समावेश करा

भात खाल्ल्यामुळे डायबिटीज होतो असा सरधोपट निष्कर्ष काढणं योग्य नाही. आहारात संतुलन राखलं, वेळापत्रक सांभाळलं आणि जीवनशैलीत बदल केला तर भात देखील आरोग्याचा शत्रू न राहता, पोषणाचा भाग होऊ शकतो. त्यामुळे भीतीपोटी भात टाळण्याऐवजी, आहारातील चांगल्या सवयी अंगीकारा!


 


सम्बन्धित सामग्री