Surgery प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image
मेरठ: मेरठमधील एका खाजगी रुग्णालयात वजन कमी करण्यासाठी करण्यात आलेल्या बॅरिएट्रिक सर्जरीनंतर 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात रुग्णाच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांवर निष्काळजीपणाचे गंभीर आरोप करत संताप व्यक्त केला. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि तक्रार सीएमओकडे पाठवण्यात आली आहे.
फेसबुकवरील जाहिरात पाहून केली शस्त्रक्रिया -
प्राप्त माहितीनुसार, रजनी गुप्ता सदर बाजार येथील रहिवासी होत्या. त्यांना न्यूट्रिमा रुग्णालयात 11 जुलै रोजी बॅरिएट्रिक सर्जरीसाठी दाखल करण्यात आले होते. फेसबुकवरील जाहिरात पाहून त्या उपचारासाठी आल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी शिवानी गुप्ता हिचीही सर्जरी नियोजित होती. शिवानीचे ऑपरेशन यशस्वी झाले, मात्र रजनीच्या शस्त्रक्रियेनंतर काही दिवसांत तिच्या पोटात संसर्ग झाला आणि 16 जुलै रोजी रजनीचा मृत्यू झाला.
कुटुंबीयांचा आरोप -
रजनीच्या मुलगा शुभम गुप्ताने सांगितले की, शस्त्रक्रियेनंतर आईच्या पोटात तीव्र वेदना होत होत्या, पण डॉक्टरांनी त्याकडे दुर्लक्ष केले. कुटुंबाचा दावा आहे की, रुग्णालयाने 24 तासांत 30 किलो वजन कमी करण्याचे आश्वासन दिले होते. तथापी, बॅरिएट्रिक सर्जरी करणारे डॉ. ऋषी सिंघल यांनी निष्काळजीपणाचे आरोप फेटाळले आहेत. त्यांनी सांगितले की, रजनी गुप्तांना मधुमेह, उच्च रक्तदाब आणि थायरॉईडसारख्या आधीपासूनच अनेक गंभीर समस्या होत्या. रजनीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा -इस्रायलचा सीरियावर हल्ला; जीव वाचवण्यासाठी टीव्ही अँकरने स्टुडिओतून काढला पळ
प्रशासनाकडून चौकशीचे आश्वासन -
दरम्यान, पोलिस निरीक्षक शिलेश कुमार यांनी सांगितले की, या प्रकरणाची तक्रार सीएमओकडे पाठवण्यात आली असून, तपास अहवाल आल्यानंतर कायदेशीर कारवाई केली जाईल. सीएमओ डॉ. अशोक कटारिया यांनी सांगितले की, तक्रार मिळाल्यावर तपास सुरू केला जाईल.
हेही वाचा - धनबादमध्ये उंदरांवर 800 बाटल्या दारू पिल्याचा आरोप; काय आहे नेमकं प्रकरण?
बॅरिएट्रिक सर्जरी म्हणजे काय?
बॅरिएट्रिक सर्जरी ही वजन कमी करण्यासाठी करण्यात येणारी शस्त्रक्रिया आहे. ही प्रक्रिया शरीरात खाद्यप्रक्रिया बदलून लठ्ठपणावर नियंत्रण मिळवण्यास मदत करते, मात्र यामध्ये धोकेही असतात. तथापी, ज्या व्यक्तींना आधीपासून आरोग्यविषयक तक्रारी आहेत, अशा रुग्णांसाठी ही शस्त्रक्रिया अधिक धोकादायक ठरू शकते.