Ro Ro Ferry: गोव्याने आज जलवाहतुकीच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. चोडण रिबंदर मार्गावर अत्याधुनिक गंगोत्री आणि द्वारका या दोन रो रो फेऱ्यांचे उद्घाटन करून जनतेसाठी आज पासून खुल्या केल्या आहेत. सार्वजनिक वाहतुकीचे आधुनिकीकरण आणि नागरिकांसाठी दररोजची जोडणी सुधारण्याच्या सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा हा भाग आहे.
विजय मरीन शिपयार्ड्स यांच्यामार्फत डिझाइन आणि निर्मित झालेल्या या फेऱ्या गोव्यातील शिपबिल्डिंग क्षमतांचे आणि 'मेक इन इंडिया'च्या माध्यमातून स्वयंपूर्णतेच्या दिशेने सरकारच्या प्रयत्नांचे प्रतीक आहेत. केवळ दीड वर्षांत पूर्ण झालेल्या या प्रकल्पामध्ये राज्य सरकारने सुमारे ₹25 कोटींची गुंतवणूक केली आहे. हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीला साजेसा असून पायाभूत सुविधा, किनारी जोडणी आणि आत्मनिर्भर भारत यावर त्यांनी दिलेला भर राज्यांना नवीन उंची गाठण्यासाठी प्रेरित करत आहे. रो-रो फेरी प्रकल्प भारताच्या वेगवान, नाविन्यपूर्ण आणि सर्वसमावेशक विकासदृष्टिकोनाचे उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे.
हेही वाचा: IMD Forecast: पावसाने फिरवली पाठ; जुलै महिन्यात मुंबईत सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस
प्रत्येक फेरीत 100 प्रवासी, 15 ते 16 चारचाकी वाहने आणि 30 ते 40 दुचाकी वाहने नेण्याची क्षमता आहे. पारंपरिक फेऱ्यांच्या तुलनेत दुप्पट म्हणजेच 10 नॉट्स या वेगाने चालणाऱ्या या फेऱ्यांमुळे प्रवासाचा कालावधी आणि प्रतीक्षा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. या सेवा दररोज सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत सुरू राहणार आहेत. ही सेवा अत्यंत सुलभ आणि परवडणारी आहे. प्रवाशांसाठी आणि दुचाकी चालकांसाठी सेवा मोफत, तर चारचाकी वाहनांसाठी केवळ ₹30 इतका नाममात्र दर आकारला जाणार आहे. यामुळे रोजंदारी करणारे नागरिक, व्यापारी आणि पर्यटक यांना स्वस्त, जलद व पर्यावरणपूरक जलमार्ग सेवा उपलब्ध होणार आहे.
नेदरलँड्समधून आयात केलेली प्रगत प्रणोदन प्रणाली आणि थ्रस्टर्समुळे या फेऱ्यांची दिशा नियंत्रण, सुरक्षेचा स्तर आणि प्रवासातील गती अधिक सुधारली आहे. प्रशिक्षित कर्मचारी आणि आधुनिक प्रणालींमुळे सेवा विश्वासार्ह व अखंड राहील, याची खात्री दिली जात आहे. या प्रकल्पाची आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचा स्वयंभूत कार्यप्रणाली असलेला आर्थिक मॉडेल. बांधकाम, मनुष्यबळ, देखभाल आणि चालवणे हे सर्व जबाबदाऱ्या कंत्राटदाराकडे असून राज्य सरकारवर कोणताही आर्थिक भार येणार नाही.
पर्यावरणाच्या दृष्टीनेही या फेऱ्या एक मोठे पाऊल आहेत. पारंपरिक फेऱ्यांच्या तुलनेत यामधून धूर, इंधन खर्च आणि प्रदूषण खूपच कमी आहे, ज्यामुळे शाश्वत वाहतुकीच्या दिशेने गोवा पुढे जात आहे. उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, 'या फेऱ्या केवळ नव्या वाहतूक सुविधा नाहीत, तर त्या नव्या आश्वासनाचं प्रतीक आहेत. वेग, सुरक्षितता, शाश्वतता आणि आत्मनिर्भरतेचं. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली गोवा आधुनिक पायाभूत सुविधांच्या दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल करत आहे. गोव्यातच तयार झालेल्या या रो-रो फेऱ्या, शेवटच्या माणसापर्यंत जागतिक दर्जाची सेवा पोहोचवण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेला साजेशा आहेत.'
रो रो फेऱ्यांचे उद्घाटन गोव्यातील हजारो प्रवाशांसाठी दररोजच्या प्रवासात सुलभता तर आणेलच, पण भविष्यातील नागरिक केंद्रित पायाभूत सुविधा उभारण्याच्या दिशेने दिशादर्शक ठरेल. हे नव्या युगातील, नाविन्यपूर्ण आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी कार्य करणाऱ्या गोव्याचं प्रतीक ठरणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार श्री सदानंद तनावडे, जलवाहतूक मंत्री सुभाष फळदेसाई, मायेमचे आमदार, सचिव श्रीमती चेष्टा यादव व इतर मान्यवर उपस्थित होते.