Indian Railways: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत ट्रेनच्या सुटण्याच्या सुमारे 4 तास आधी आरक्षण चार्ट तयार केला जात होता. मात्र आता, ही वेळ वाढवून 8 तास करण्यात येणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब केला असून, येत्या काही महिन्यांत हा बदल टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येणार आहे.
रेल्वेच्या नव्या निर्णयानुसार, जर ट्रेन दुपारी 2 वाजेच्या आधी सुटत असेल, तर संबंधित प्रवासासाठीचा आरक्षण चार्ट एक दिवस आधी रात्री 9 वाजताच तयार केला जाईल. या निर्णयामुळे त्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, ज्यांची तिकीटं वेटिंग लिस्टमध्ये असतात किंवा जे दूरवरून ट्रेन पकडण्यासाठी येतात. त्यांना त्यांच्या सीट स्टेटसची माहिती वेळेत मिळेल, आणि दुसऱ्या पर्यायांची तयारी करता येईल.
हेही वाचा: महत्वाची बातमी: 1 जुलैपासून UPI आणि तात्काळ तिकीट बुकिंगसह अनेक नियमांमध्ये मोठे बदल; जाणून घ्या
रेल्वे प्रवाशांना मिळणार 'स्मार्ट' अनुभव
रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांचा अनुभव अधिक पारदर्शक, सुलभ आणि प्रभावी करण्यासाठी पुढील काही महिन्यांत अनेक मोठे बदल करण्याचे नियोजन केले आहे. ‘स्मार्ट आणि पारदर्शक’ तिकीट बुकिंग प्रणाली ही त्यातील एक महत्त्वाची पायरी असेल. रेल्वे बोर्डाच्या बैठकीत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, “प्रवाशांचा सन्मान राखणारी आणि त्यांच्यासाठी उपयुक्त ठरणारी प्रणाली उभारणे हीच खरी गरज आहे.”
नवीन PRS प्रणाली डिसेंबर 2025 पर्यंत
रेल्वेने यासोबतच नवीन प्रवासी आरक्षण प्रणाली (Passenger Reservation System - PRS) तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. ही आधुनिक प्रणाली डिसेंबर 2025 पर्यंत लागू केली जाईल, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. यामध्ये बुकिंग अधिक वेगवान, सुलभ आणि सुरक्षित होईल. तांत्रिक बाबी अधिक प्रगत असतील आणि युजर इंटरफेस देखील सुधारित केला जाईल.
तात्काळ तिकीट बुकिंगसाठीही येणार कठोर नियम
तात्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियेमध्येही बदल होणार असून, यात एजंटसाठी बुकिंग वेळेचे बंधन, ओटीपी आधारित लॉगिन, आधार व्हेरिफिकेशन अशा सुविधा बंधनकारक केल्या जातील. यामुळे सामान्य प्रवाशांना अधिक संधी मिळेल आणि दलालगिरीला आळा बसेल.
प्रवाशांना मिळणारे फायदे
या नवीन चार्टिंग वेळेमुळे प्रवाशांना अनेक फायदे मिळणार आहेत:
-वेटिंग लिस्ट क्लिअर झाली आहे की नाही, याची लवकर माहिती मिळेल.
-दूरवरून येणाऱ्या प्रवाशांना प्रवासाची व्यवस्था नीट करता येईल.
-बुकिंग किंवा कॅन्सलेशनसाठी जास्त वेळ उपलब्ध असेल.
-प्रवाशांच्या मानसिक तणावात घट होईल.
रेल्वेचा उद्देश आहे की, प्रवास केवळ ‘तिकीट मिळवणे’ एवढ्यावर न थांबता तो एक चांगला अनुभव ठरावा. त्यामुळे या निर्णयाचे स्वागत देशभरातील प्रवासी करत आहेत.