Friday, December 13, 2024 12:24:03 PM

Mumbai
इटलीच्या नौदलाचे प्रशिक्षण जहाज मुंबईत

इटलीच्या नौदलात प्रवेश केलेल्या तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठी प्रशिक्षण जहाजाचा वापर केला जातो. हे जहाज सध्या भारतीय नौदलाच्या पश्चिम तळाच्या भेटीवर मुंबई बंदरात आले आहे.

इटलीच्या नौदलाचे प्रशिक्षण जहाज मुंबईत

मुंबई : इटलीच्या नौदलात प्रवेश केलेल्या तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठी प्रशिक्षण जहाजाचा वापर केला जातो. हे जहाज सध्या भारतीय नौदलाच्या पश्चिम तळाच्या भेटीवर मुंबई बंदरात आले आहे. अमेरिगो वेस्पुची असे या जहाजाचे नाव आहे. या जहाजाची निर्मिती 1930 मध्ये झाली. हे जहाज जुलै 2023 पासून जगाच्या भ्रमंतीला निघाले आहे. या दौऱ्यादरम्यान हे जहाज पाच दिवसांसाठी मुंबईत आले आहे. जहाज मुंबईत असताना या जहाजावर विल्लाजियो इटालिया नावाच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात इटलीच्या कौशल्यांचे सादरीकरण करण्यात आले. 

सध्या इटलीचे प्रशिक्षण जहाज इंदिरा गोदीत आहे. या जहाजाच्या सन्मानार्थ मुंबई बंदरात चित्रकला स्पर्धा, विविध वस्तूंचे प्रदर्शन - विक्री, इटलीच्या वाद्यवृंदाचा कार्यक्रम आणि एका विशेष चित्रपटाच्या खेळाचे आयोजन करण्यात आले होते. या व्यतिरिक्त इटली सरकारच्या मंत्र्यांनी इटलीत गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी उद्योजकांना उद्देशून एका कार्यक्रमाचेही मुंबईत आयोजन केले होते. 

इटलीचे प्रशिक्षण जहाज मुंबईत असताना इटलीच्या नौदल प्रशिक्षण विभागाचे प्रमुख पर्सोनेल एज्युकेशन व्हाईस ॲडमिरल अँटोनियो नताले यांनी भारतीय नौदलाच्या पश्चिम तळाचे प्रमुख व्हाईस ॲडमिरल संजय जे सिंग यांची भेट घेतली. या भेटीत भारत आणि इटलीच्या नौदलात समन्वय राखण्यासाठी काय करता येईल यावर चर्चा झाली. दोन्ही देशांच्या नौदल अधिकाऱ्यांनी परस्परांच्या नौसैनिकांनी आतापर्यंत दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण केले. व्हाईस ॲडमिरल अँटोनियो नताले यांनी मुंबईत गौरव स्तंभाला भेट देऊन बलिदान देणाऱ्या वीर नौसैनिकांना आदरांजली अर्पण केली. 

अमेरिगो वेस्पुची हे इटलीचे प्रशिक्षण जहाज 101 मीटर लांबीचे आहे. या 3410 टन वजनाच्या जहाजाचे नेतृत्व कॅप्टन ज्युसेप्पे लाय करत आहेत. कॅप्टन लाय यांचे मुंबईत रिअर अॅडमिरल राहुल विलास गोखले यांनी स्वागत केले. इटलीचे प्रशिक्षण जहाज सोमवार 2 डिसेंबरपर्यंत मुंबईत आहे. हे जहाज फेब्रुवारी 2025 पर्यंत 30 पेक्षा जास्त बंदरांना भेट देणार आहे. 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo