पुणे : पोर्शे अपघात प्रकरणात नवी धक्कादायक माहिती हाती आली आहे. ज्या पोर्शे गाडीची वाहतूक पोलिसांकडे नोंदणी झाली नव्हती ती गाडी एकपेक्षा जास्त वेळा रस्त्यावर आली होती आणि चालवली गेली होती. अल्पवयीन असल्यामुळे वेदांतकडे परवाना नव्हता. पण परवाना नसूनही त्याने एकपेक्षा जास्त वेळा वाहतूक पोलिसांकडे नोंदवली नसलेली पोर्शे गाडी चालवली होती. पुणे शहर पोलिसांनी ही बाब सिद्ध करण्यासाठी सीसीटीव्ही फूटेज संकलित केल्याचे सांगितले.
अपघात केला त्या दिवशी १७ वर्षे ८ महिन्यांचा असलेला वेदांत अपघाताच्या एक दिवस आधीही पोर्शे चालवत होता. त्याने महाविद्यालयामध्ये पोर्शे गाडी नेली होती. यावेळी गाडीत वेदांत आणि त्याचा मित्र हे दोघेच होते आणि गाडी स्वतः वेदांत चालवत होता. महाविद्यालयाच्या परिसरातील सीसीटीव्ही फूटेजमध्ये वेदांत चालकाच्या आसनावरून उतरून गाडीतून बाहेर पडताना दिसत आहे. अपघात झाला त्यावेळी मध्यरात्री वेदांत पबमधून बाहेर पडला. पबमधून बाहेर पडताना वेदांत दारुच्या नशेत होता पण शुद्धीत होता. स्वतः वाहन चालवल्यास अपघात होऊ शकतो याची जाणीव त्याला होती. ही जाणीव असूनही त्याने गाडी चालवण्याचा निर्णय घेतल्याचे पोलीस म्हणाले. याच कारणामुळे वेदांत विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवल्याचे पुणे शहर पोलिसांनी सांगितले.