मुंबई : विधानसभा निवडणुकीत सत्ता काबीज करण्याच्या निर्धाराने आखाड्यात उतरलेल्या महाविकास आघाडीमध्ये जागावाटपापासून सुरू झालेली धुसफुस अद्यापही कायम आहे. दोन्ही पक्षांचे नेते प्रचारसभांमधून एकमेकांना इशारे देत आहेत. मविआतील नेते एकमेकांविरोधात तू तू में में करताना थांबत नसल्याचे चित्र दिसत आहे. नेत्यांच्या इशारावजा भाषणांमुळे कार्यकर्त्यांत संभ्रम आहे. काँग्रेसने आघाडीचा धर्म पाळावा, अन्यथा आम्हीही ताकद दाखवू, असा थेट इशाराच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्याने आघाडीतील बेबनाव सातत्याने चव्हाट्यावर येत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये स्थानिक पातळीवर अनेक मतदारसंघांमध्ये आपापसांत मतभेद आहेत. नेत्यांच्या इशाऱ्यांमुळे कॉंग्रेस - शिवसेना ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारी एकमेकांना अनेक मतदारसंघांमध्ये मदत करत नसल्याचे चित्र आहे.