नवी दिल्ली: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानवर टीकास्त्र सोडले आहे. पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना प्रशिक्षण, निधी आणि शस्त्रे पुरवत असून तो भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करू इच्छित आहे, असा आरोप ओवेसींनी केला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर असदुद्दीन ओवैसी यांनी यापूर्वी अनेक वेळा पाकिस्तानवर निशाणा साधला आहे.
ओवेसी यांनी म्हटलं आहे की, पाकिस्तानी डीप स्टेट आणि पाकिस्तानी सैन्याचे उद्दिष्ट भारताची अर्थव्यवस्था नष्ट करणे आणि समुदायांमध्ये फूट पाडणे आहे. पाकिस्तान स्वतःला इस्लाम आणि सर्व मुस्लिमांचा नेता म्हणून सादर करतो, परंतु हे पूर्णपणे मूर्खपणा आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादामुळे भारताला खूप त्रास सहन करावा लागला आहे. झिया-उल-हकच्या काळापासून आपण सर्वांनी लोकांचा नरसंहार पाहिला आहे, असंही ओवेसी यांनी नमूद केलं आहे. हे उल्लेखनीय आहे की, मोदी सरकारने सर्वपक्षीय शिष्टमंडळात ओवैसी यांचाही समावेश केला आहे. ओवेसी जागतिक पातळीवर पाकिस्तानचा पर्दाफाश करणार आहेत.
हेही वाचा - आता उपग्रहाद्वारे ठेवण्यात येणार शत्रूवर नजर! ISRO उद्या लाँच करणार 'हा' उपग्रह
झिया-उल-हकच्या काळापासून निष्पाप लोकांचा बळी -
पाकिस्तान 1948 पासून भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे आणि तो अजूनही त्यात गुंतलेला आहे आणि मला वाटत नाही की तो हे करणे कधीही थांबवेल. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद बऱ्याच काळापासून निष्पाप लोकांचे जीव घेत आहे. भारत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा बळी आहे. आपण हे सगळं दृश्य पाहिलं आहे आणि झिया उल हकच्या काळापासून लोक मारले जात आहेत.
हेही वाचा - तुर्कीच्या Celebi ची न्यायालयात धाव! Indothai सांभाळणार मुंबई विमानतळाची जबाबदारी
परदेशातील भारतीय शिष्टमंडळाबद्दल बोलताना ओवेसी म्हणाले की, सध्या तरी मला माहित आहे की मी ज्या गटात आहे त्याचे नेतृत्व माझे चांगले मित्र बैजयंत जय पांडा करतील. त्यात निशिकांत दुबे, फंगन कोन्याक, रेखा शर्मा, सतनाम सिंग संधू आणि गुलाम नबी आझाद यांचा समावेश असेल. आम्ही यूके, फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी, इटली आणि डेन्मार्कमध्ये पाकिस्तानचा पर्दाफाश करणार आहोत.