Government school roof collapsed In Rajasthan प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image
जयपूर: राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यातील पिपलोडी येथील सरकारी शाळेतील इमारतीचा छताचा भाग कोसळला. या दुर्घटनेत 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तसेच 28 जण जखमी झाले. या दुर्घटनेमुळे संपूर्ण राज्यभरात शोककळा पसरली आहे. सकाळी 7:45 वाजता झालेल्या या दुर्घटनेवेळी, 6 वी व 7 वीच्या वर्गातील सुमारे 35 विद्यार्थी शाळेच्या सभागृहात उपस्थित होते. इमारतीचा स्लॅब कोसळल्यानंतर काँक्रीट आणि विटांच्या ढिगाऱ्याखाली अनेक मुले गाडली गेली. ग्रामस्थ, शिक्षक आणि आपत्कालीन सेवांनी दिलेल्या मदतीने अनेकांना बाहेर काढले.
9 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर
जखमी विद्यार्थ्यांपैकी 9 जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर झालावाड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेनंतर जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करत, पाच शिक्षकांना निलंबित केलं आहे. निलंबित अधिकाऱ्यांमध्ये मीना गर्ग, जावेद अहमद, रामविलास लववंशी, कन्हैयालाल सुमन आणि बद्रीलाल लोढा यांचा समावेश आहे.
हेही वाचा - सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता 30 दिवसांची रजा घेऊनही मिळणार पूर्ण पगार
राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी व्यक्त केलं दुःख -
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोशल मीडियावर या घटनेबाबत शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेला 'दुःखद आणि वेदनादायक' म्हणत, बाधित कुटुंबांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असं आश्वासन दिलं आहे.
हेही वाचा - अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाच्या 112 वैमानिकांनी घेतली होती आजारी रजा
राज्य सरकारकडून चौकशी सुरू
राजस्थान सरकारने या घटनेच्या पूर्ण चौकशीचे आदेश दिले आहेत. शाळेच्या इमारतीची संरचनात्मक तपासणी व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. या घटनेमुळे राज्यातील ग्रामीण शाळेच्या पायाभूत सुविधांच्या स्थितीबद्दल पुन्हा चिंता निर्माण झाली आहे.