गोंदिया : शिवशाही बस उलटून आठ जणांचा मृत्यू झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्यात सडक अर्जुनीमधील खजरी गावाजवळ घडली. घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. आतापर्यंत सात मृतदेह बसमधून बाहेर काढण्यात आले आहेत. जखमींना साकोली उपजिल्हा रुग्णालयात आणि गोंदियाच्या सामान्य रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. दुपारी एकच्या सुमारास अपघात झाला. अपघातातील गंभीर जखमींची संख्या मोठी आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
पूर्ण क्षमतेने भरलेली शिवशाही बस उलटून अपघात झाला. अपघातानंतर बस सुमारे पन्नास फुटांपर्यंत घासत गेली. यामुळे अनेकजण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले. मृतांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची मदत देण्याचे निर्देश काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले. एकनाथ शिंदे यांच्याकडेच परिवहन मंत्रालयाची जबाबदारी आहे. अपघाताची माहिती मिळताच त्यांनी परिवहन विभागाला मृतांच्या कुटुंबियांना तातडीनं आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांच्या वैद्यकीय उपचारांचा खर्चदेखील शासन करणार आहे. मृतांचा आकडा वाढू नये यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना शिंदे यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत.
अपघाताची माहिती मिळताच भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनीही दुःख व्यक्त केले आहे. 'गोंदिया जिल्ह्यातील सडकअर्जुनीनजीक शिवशाही बसचा दुर्दैवी अपघात होऊन काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत,' असं फडणवीसांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.