नवी दिल्ली: पाकिस्तानच्या सीमेवरील राज्यांमध्ये पुन्हा सायरन वाजवले जातील आणि ब्लॅकआउट केले जाईल. केंद्रातील मोदी सरकारने पाकिस्तानच्या सीमेवरील जिल्ह्यांमध्ये मॉकड्रिल करण्याचा निर्णय घेतला आहे. दर महिन्याला मॉकड्रिल केले जातील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिन्यात 31 मे रोजी सीमेवरील भागात मॉकड्रिल अंतर्गत लोकांना सतर्क राहण्याचे प्रशिक्षण दिले जाईल.
ऑपरेशन शील्ड अंतर्गत मॉकड्रिलचे आयोजन -
शनिवारी जम्मू आणि काश्मीर, हरियाणा, पंजाब, राजस्थान, चंदीगड आणि गुजरातमध्ये मॉकड्रिल केले जातील. तसेच भारताला लागून असलेल्या पाकिस्तानी सीमेवरील भागात राहणाऱ्या लोकांना प्रशिक्षण दिले जाईल. ऑपरेशन शील्ड अंतर्गत आयोजित मॉकड्रिलमध्ये ब्लॅकआउट आणि सायरन देखील वाजवले जातील. ऑपरेशन शील्ड अंतर्गत मॉक ड्रिलचा उद्देश सीमावर्ती राज्यांमध्ये आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयारी तपासणे आहे. या मॉक ड्रिलमध्ये स्थानिक पोलिस, नागरी संरक्षण, एनडीआरएफ, आरोग्य विभाग आणि इतर आपत्कालीन एजन्सी सहभागी असतील.
हेही वाचा - मोठी बातमी! अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर हल्ला; BLA चा दावा
यापूर्वी केंद्र सरकारने 29 मे रोजी पाकिस्तानच्या सीमेवरील जिल्ह्यांमध्ये नागरी सुरक्षा सराव किंवा मॉकड्रिल करण्याची घोषणा केली होती, परंतु नंतर ती पुढे ढकलण्यात आली. मॉकड्रिल अंतर्गत शत्रू देशांच्या विमाने, ड्रोन, क्षेपणास्त्रांपासून होणाऱ्या हवाई हल्ल्यांपासून कसे वाचायचे हे शिकवले जाईल.
हेही वाचा - 'भारतात हिंदू-मुस्लिम दंगली घडवण्याचे दहशतवाद्यांचे उद्दिष्ट आहे'; ओवैसींकडून रियाधमध्ये पाकिस्तानचा पर्दाफाश
7 मे रोजी देशभरात मॉक ड्रिल -
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला होता. ऑपरेशन सिंदूरच्या काही तास आधी, केंद्र सरकारने 7 मे रोजी देशभरात मॉक ड्रिल केले होते. त्याच रात्री भारतीय सैन्याने पाकिस्तानचे 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले.