Saturday, July 27, 2024 04:29:18 PM

जाणून घ्या अक्षय तृतीयेचे महत्व

जाणून घ्या अक्षय तृतीयेचे महत्व

मुंबई, १० मे २०२४, प्रतिनिधी : अक्षय तृतीयेचा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. यादिवशी सोने-चांदी, घर-संपत्ती, वाहन खरेदी करण्याला खास महत्व आहे. यंदा अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त कधी आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

अक्षय तृतीया

यंदा (२०२४) अक्षय तृतीया शुक्रवारी १० मे रोजी साजरी केली जाणार आहे. अक्षय तृतीया दरवर्षी वैशाख शुक्ल तृतीयेला साजरी केली जाते. यंदा तृतीया तिथी शुक्रवारी, १० मे रोजी पहाटे ४ वाजून १७ मिनिटांनी सुरू होईल. ही तिथी शनिवारी, ११ मे रोजी पहाटे २ वाजून ५० मिनिटांनी ही तृतीया तिथी समाप्त होईल. म्हणजेच तिथीनुसार, या वर्षी अक्षय्य तृतीया १० मे रोजी आहे. धार्मिक मान्यतेनुसार, त्रेता आणि सतयुगाची सुरूवात ही अक्षय तृतीयेला झाली, म्हणून या तृतीयेला कृतयुगादि तृतीया असेही म्हटले जाते.

अक्षय तृतीयेचे महत्व

हिंदू धर्मात गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा आणि बलिप्रतिपदेचा अर्धा दिवस हे साडे तीन मुहूर्त आहेत. त्यामुळे अक्षय तृतीयेचा पूर्ण दिवस कोणत्याही शुभकार्याची सुरवात करण्यासाठी किंवा कोणतेही शुभकार्य पूर्ण करण्यासाठी विशेष मनाला जातो. कोणताही नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी, नोकरी किंवा सोने, दागिने, नवीन घर, दुकान, गाडी, जमीन इत्यादी खरेदीसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. तसेच, लग्न, जावळ, बारसं, वास्तू पूजा अशा धार्मिक कार्यांसाठीही हा दिवस शुभ मनाला जातो. या दिवशी केलेले दानही फलदायी मानले जाते, त्यामुळे या दिवशी दानधर्म करण्याचीही प्रथा आहे.

अक्षय्य तृतीया आणि पौराणिक कथा

अक्षय तृतीयेशी अनेक पौराणिक कथा जोडल्या आहेत. याच दिवशी भगवान विष्णूचा सहावा अवतार असलेले भगवान परशुराम यांचा जन्म झाला असे म्हटले जाते. तसेच महाभारताचे रचनाकार महर्षी वेद व्यास यांचाही जन्म अक्षय तृतीयेला झाला असे म्हटले जाते. अक्षय तृतीयेच्याच दिवशी भगवान विष्णूने नृसिंहाचा अवतार घेतला असेही मानले जाते. याच दिवशी गंगा नदी पृथ्वीवर अवतरली असेही म्हटले जाते. महाभारतातील कुरुक्षेत्र युद्धाची सुरुवातही अक्षय तृतीयेला झाली असेही उल्लेख पुराणात आढळतात.


सम्बन्धित सामग्री