ठाणे: ठाण्यातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. बनावट गुंतवणूक योजनेचे आमिष दाखवून एका व्यक्तीची 83 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिस एका 51 वर्षीय व्यक्तीचा शोध घेत आहेत. आरोपीने 24% ते 30% वार्षिक परतावा देण्याचे आश्वासन देत अनेक गुंतवणूकदारांना गंडा घातल्याचा आरोप आहे.
गुंतवणूक कंपनीत भरघोस परताव्याचे आमिष -
प्राप्त माहितीनुसार, 72 वर्षीय तक्रारदार ऐरोली येथील रहिवासी आहे. त्यांची आरोपीशी ओळख एका मित्रामार्फत झाली होती. आरोपीने नौपाडा, ठाणे येथे एका गुंतवणूक कंपनीत भरघोस परताव्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला काही वेळेस मुद्दल आणि व्याज परत मिळाल्यामुळे तक्रारदाराचा विश्वास वाढला.
हेही वाचा - Latur Crime: 17 वर्षीय एचआयव्ही बाधित मुलीवर अत्याचार; सेवालयातीलच कर्मचार्याने केला गर्भपात
त्यानंतर 2023 ते मार्च 2024 या काळात तक्रारदार आणि त्याच्या कुटुंबाने तब्बल 73 लाख रुपये गुंतवले. मात्र, मुदतीनंतर परतावा थांबला. कंपनीने निधी नसल्याचे कारण देत चेकही बाउन्स केले. यामुळे फसवणुकीचा प्रकार उघड झाला. तक्रारदाराच्या एका मित्राचेही 10 लाख रुपये बुडाले.
हेही वाचा - व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये मराठी वापरल्याने नवी मुंबईत 20 वर्षीय विद्यार्थ्यावर 4 मित्रांचा हल्ला
आरोपी विरोधात गुन्हा दाखल -
फसवणूक लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अन्य संबंधित कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.