Sunday, August 17, 2025 04:55:13 PM

अरबी समुद्र खवळण्याची शक्यता; मच्छीमारांना सतर्कतेचं आवाहन

अरबी समुद्रात हवामान बदलामुळे 21 मेपासून कमी दाबाचा पट्टा तयार होऊन 24 मेपर्यंत तीव्र होण्याची शक्यता, रायगड, रत्नागिरी, मुंबई, पालघर किनाऱ्यावर समुद्र खवळण्याचा धोका.

अरबी समुद्र खवळण्याची शक्यता मच्छीमारांना सतर्कतेचं आवाहन

मुंबई: अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या हवामानातील बदलांमुळे रायगड, रत्नागिरी, मुंबई आणि पालघर किनारपट्टीवर समुद्र खवळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 21 मेपासून अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे, जो 24 मेपर्यंत तीव्र होत उत्तरेकडे सरकू शकतो. राज्याच्या किनाऱ्याला थेट धोका नसला तरी या हवामान बदलाचा परिणाम समुद्राच्या स्थितीवर जाणवू शकतो.

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मच्छीमारांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी सूचित केलं आहे की, हवामान खात्याच्या ताज्या अपडेट्सकडे सातत्यानं लक्ष देणं आवश्यक आहे. तसेच स्थानिक प्रशासन व मच्छीमार सहकारी संस्थांकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचं काटेकोर पालन करणं महत्त्वाचं आहे.

हेही वाचा:महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा कहर; शेतीचे मोठे नुकसान, राज्यात ऑरेंज आणि रेड अलर्ट

आपत्ती व्यवस्थापन विभागाने 21 ते 24 मेदरम्यान मच्छीमारांनी खोल समुद्रात जाणं पूर्णतः टाळावं, असा इशारा दिला आहे. या काळात समुद्रात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे लहान बोटींचा वापर टाळून फक्त किनाऱ्यालगतच मासेमारी करावी. सुरक्षिततेसाठी लाईफ जॅकेट्स, वायरलेस सेटसारखी आवश्यक साधनं जवळ ठेवावीत.

त्याचबरोबर, संभाव्य वाऱ्याचा वेग आणि लाटांचा जोर लक्षात घेऊन किनाऱ्यावरील बोटी व होड्या सुरक्षित स्थळी हलवाव्यात. समुद्र खवळलेला असताना मासेमारी टाळावी आणि स्वतःची व इतरांची सुरक्षितता जपावी, असं आवाहन अधिकाऱ्यांकडूनही करण्यात आलं आहे.

या काळात मच्छीमार समाजाने विशेष काळजी घ्यावी, जेणेकरून कोणतीही दुर्घटना टाळता येईल. प्रशासनाकडून सतत सूचना आणि अपडेट्स देण्यात येणार आहेत. त्यामुळे या काळात सावध राहून नियमांचं पालन करणं अत्यावश्यक आहे.


सम्बन्धित सामग्री