मुंबई: हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र मानलं जातं. भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेचं आशीर्वाद मिळवण्यासाठी तुळशीची पूजा महत्त्वाची मानली जाते. सध्या जेष्ठ महिना सुरू असल्यामुळे तुळशी पूजनाचं धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय महत्त्व आणखी वाढतं. मान्यता आहे की, या महिन्यात रोज तुळशीची पूजा केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि घरात धन-समृद्धीचं आगमन होतं.
पण फक्त पूजन पुरेसं नाही, तुळशीच्या आजूबाजूचं वातावरणही शुद्ध आणि सकारात्मक असणं गरजेचं आहे. वास्तुशास्त्रानुसार तुळशीजवळ काही विशिष्ट वस्तू ठेवणे निषिद्ध मानले जाते, कारण त्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि लक्ष्मीमातेचा कोप होऊ शकतो.
1. काटेरी झाडं ठेवू नका:
वास्तुशास्त्रानुसार तुळशीच्या आसपास काटेरी झाडं जसे की कॅक्टस किंवा गुलाबाचे रोपे ठेवू नयेत. अशा झाडांमुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरात आर्थिक अडचणी निर्माण होतात.
2. कचरा किंवा कचरा पेटी ठेवू नका:
तुळशी हे शुद्धतेचं प्रतीक आहे. तिच्याजवळ कचरा किंवा कचरापेटी ठेवल्यास लक्ष्मीमातेचा अपमान होतो. त्यामुळे घरात धन टिकत नाही आणि गरिबी येते.
3. चपला आणि बूट दूर ठेवा:
तुळशीजवळ बूट, चपला किंवा कोणतीही पायात घालायची वस्तू ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते. यामुळे पूजेसाठी असलेल्या जागेचं पावित्र्य भंग होतं.
4. झाडू ठेवू नका:
झाडू ही जरी घरात स्वच्छतेसाठी आवश्यक वस्तू असली तरी ती तुळशीच्या आसपास ठेवू नये. झाडूला देखील घरात सन्मानाने ठेवायला हवं, पण ती पूजास्थानाजवळ नसावी.
5. शिळं अन्न व अस्वच्छ वस्तू दूर ठेवा:
तुळशी जवळ कुठलाही सडलेला, वास येणारा किंवा शिळा पदार्थ ठेवू नये. अस्वच्छता ही नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते आणि त्यामुळे देवी लक्ष्मी रुष्ट होतात.
या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेतल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, देव-देवतांची कृपा राहते आणि समृद्धीचं वातावरण निर्माण होतं.