Wednesday, June 18, 2025 02:31:16 PM

धक्कादायक प्रकार उघडकीस: मानकोली नाक्यावर बनावट ट्रॅफिक तयार करून वाहतूक पोलिसांनी वसूल केले तब्ब्ल 12 लाख रुपये

मानकोली नाक्यावर वाहतूक पोलिसांकडून नकली ट्राफिक तयार करून ट्रक चालकांकडून लाखोंची बेकायदेशीर वसुली सुरू असून सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

धक्कादायक प्रकार उघडकीस मानकोली नाक्यावर बनावट ट्रॅफिक तयार करून वाहतूक पोलिसांनी वसूल केले तब्ब्ल 12 लाख रुपये

Fake Traffic in Mankoli: मुंबई-नाशिक महामार्गावरील मानकोली नाक्यावर वाहतूक पोलिसांकडून कृत्रिम ट्राफिक तयार करून वाहनचालकांकडून लाखोंची अनधिकृत वसुली सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका व्हायरल व्हिडिओमुळे हा प्रकार उघडकीस आला असून, सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू आहे.

भिवंडी परिसरातील या नाक्यावर खास करून ट्रक चालकांकडून बेकायदेशीररीत्या पावत्या फाडून प्रत्येकी 600 रुपये आकारले जात आहेत. दिवसाला सुमारे 2000 ट्रक या मार्गावरून जातात. त्यानुसार रोज सुमारे 12 लाख रुपयांची वसुली होत असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. ही वसुली करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून रस्त्यावर कृत्रिमपणे वाहतूक कोंडी केली जाते आणि ट्रक थांबवून त्यांच्याकडून पैसे घेतले जातात.

हेही वाचा: 'नाशिकचं अनाथ आश्रम केलंय' राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीसांना टोला

या प्रकारात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे वाहतूक पोलिसांना सहाय्य करणारे कर्मचारी हे परप्रांतीय असून त्यांच्याकडे अधिकृत पोलीस उपकरणं जसे की वॉकी-टॉकी, वायरलेस सेट देण्यात आले आहेत. या केबिनमध्ये फाडलेल्या पावत्यांचा कोणताही लेखाजोखा नाही, त्यामुळे यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

वाहनचालकांकडून कोणत्याही कागदपत्रांची तपासणी केली जात नाही. केवळ पैसे दिल्यानंतरच वाहनांना पुढे जाण्याची परवानगी दिली जाते. परिणामी, महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण होते आणि सामान्य नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो.

हेही वाचा: 'लाडक्या बहिणी आता सरकारला नकोशा वाटतात'; हाकेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

हा संपूर्ण प्रकार सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. भारतवास चौधरी यांनी त्यांच्या फेसबुक लाईव्हवर उघड केला आहे. त्यांच्या व्हिडिओला आतापर्यंत 18 लाखांहून अधिक लोकांनी पाहिले असून 20 हजारांहून अधिक शेअर मिळाले आहेत. चौधरी यांना महाराष्ट्रभरातून पाठिंबा मिळत असून, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संबंधित अधिकाऱ्यांविरोधात तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.


सम्बन्धित सामग्री