मुंबई: महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असून, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आज (10 मार्च 2025) राज्याचा 2025-26 या आर्थिक वर्षाचा पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने अनेक आश्वासनं दिली होती, त्यातील काही मोठ्या घोषणांची पूर्तता या अर्थसंकल्पात होते का, याकडे जनतेचं लागलं आहे. राज्यातील महिलांसाठी ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अनुदानात वाढ, शेतकऱ्यांची कर्जमाफी, तसेच ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेसाठी अधिक मदत या तीन महत्त्वाच्या घोषणांवर आज शिक्कामोर्तब होणार का, याकडे विशेष लक्ष आहे.
लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये?
महायुती सरकारने 2024 मध्ये ‘माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करत महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र, निवडणुकीत ही रक्कम 2100 रुपये करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर महिलांना दरमहा 2100 रुपये कधी मिळणार, असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात ही रक्कम वाढणार का? याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत.
हेही वाचा: Maharashtra Budget 2025: महायुती सरकार आश्वासन पूर्ण करणार? तीन मुख्य घोषणांकडे संपूर्ण राज्यच लक्ष
शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार?
राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी हे महायुतीच्या जाहीरनाम्यातील सर्वात मोठं आश्वासन होतं. मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या थकित कर्जमाफीसाठी कोणती योजना जाहीर होते?, याकडे संपूर्ण कृषी समाजाचं लक्ष आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी वाढणार?
महायुती सरकारने राज्यात सुरू केलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही रक्कम 6000 वरून 9000 रुपये करण्याचं आश्वासन दिलं होतं. आता अर्थसंकल्पात या योजनेला अधिक निधी मिळणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.