महाळुंगे: वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात आधीच चर्चेत असलेले हगवणे कुटुंबीय पुन्हा एकदा कायदेशीर अडचणीत सापडले आहेत. शशांक आणि लता हगवणे यांच्या विरोधात महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तब्बल 11 लाख 70 हजार रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हगवणे कुटुंबीयांवर काही दिवसांपूर्वी वैष्णवी हगवणेला हुंड्यासाठी छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप होता. या प्रकरणाची चौकशी अजून सुरू असतानाच, शशांक आणि लता हगवणे यांनी एका व्यक्तीची आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे, त्यामुळे त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, प्रशांत येळवंडे या व्यक्तीने शशांक आणि लता हगवणे यांच्याकडून 24 लाख रुपयांना एक जेसीबी मशीन खरेदी केली होती. या व्यवहारात त्यांनी 5 लाख रुपये रोख रक्कम दिली होती, तर उर्वरित रक्कम बँकेचे कर्ज असल्यामुळे, येळवंडे यांनी दरमहा 50 हजार रुपयांचे हप्ते हगवणे कुटुंबीयांना देण्याचे ठरवले होते.
हेही वाचा: वाढदिवसा दिवशी संपवले आयुष्य… 5 वर्षांच्या मुलीची हत्या करून आईची आत्महत्या
मात्र, प्रशांत येळवंडे यांनी दिलेली रक्कम हगवणे कुटुंबीयांनी बँकेत न भरता स्वतःच्या फायद्यासाठी वापरली. परिणामी, बँकेने जेसीबी मशीन जप्त केली. त्यानंतर हगवणे कुटुंबीयांनी परस्पर बँकेत उर्वरित रक्कम भरून ती मशीन परत मिळवली, परंतु ही मशीन त्यांनी येळवंडे यांना न देता स्वतःच्या वापरासाठी ठेवली. त्यामुळे प्रशांत येळवंडे यांची आर्थिक फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.
प्रशांत येळवंडे यांनी याबाबत महाळुंगे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलीसांनी शशांक आणि लता हगवणे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी पोलीस अधिक माहिती गोळा करत आहेत.
या नवीन प्रकरणामुळे हगवणे कुटुंबीय पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून, समाजातही याविषयी तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. आता या नवीन फसवणूक प्रकरणात काय कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.