Sunday, August 17, 2025 01:42:57 AM

'मला काहीच आश्चर्य...; इम्तियाज जलील यांचा शिरसाठांवर घणाघात

संजय शिरसाठ प्रकरणावर इम्तियाज जलील यांचा घणाघात; पैसे बेडरूममधून येतात, चौकशीची मागणी. घर का भेदी कोण, याचाही शोध घेण्याची गरज असल्याचे मत.

मला काहीच आश्चर्य इम्तियाज जलील यांचा शिरसाठांवर घणाघात

छत्रपती संभाजीनगर: राज्याचे मंत्री संजय शिरसाठ यांच्या बेडरूममधून नोटांनी भरलेली बॅग सापडल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी शिरसाठांवर घणाघात केला आहे.

'संजय शिरसाठ यांच्या घरातील नोटांनी भरलेल्या बॅगेचा व्हिडिओ पाहून मला काहीच आश्चर्य वाटले नाही,' असे म्हणत इम्तियाज जलील यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. 'आजवर मला प्रश्न पडत होता की, कोट्यवधींच्या जमिनी पालकमंत्री खरेदी करत आहेत, त्यांच्याकडे एवढा पैसा कुठून येतोय? याचं उत्तर आज मिळालंय; त्यांच्या बेडरूममधूनच सगळा पैसा येतोय,' असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

त्यांनी याचबरोबर शंका उपस्थित केली की, हा पैसा नक्की कुठून आला? 'हा पैसा पीडब्ल्यूडी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला की महानगरपालिकेकडून आला? की जिल्हाधिकाऱ्यांकडून आला? कारण ते पालकमंत्री आहेत. म्हणूनच या सगळ्या गोष्टींचा सखोल तपास होणं आवश्यक आहे,' असे ते म्हणाले.

हेही वाचा: Panvel: शालेय विद्यार्थ्यांना जेवणाचे ताट धुवायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर

इम्तियाज जलील यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करत विचारले 'संजय शिरसाठ यांच्या बेडरूममध्ये कोण जाऊन हा व्हिडिओ शूट करतंय? तो 'घर का भेदी' कोण आहे हे शोधणं गरजेचं आहे. नाहीतर ‘घर का भेदी लंका डहाय’ अशीच परिस्थिती होईल.'

तसंच त्यांनी सरकारवरही निशाणा साधत म्हटलं की, 'जर सरकार खरंच गंभीर असेल, तर या संपूर्ण प्रकाराची चौकशी झाली पाहिजे. एवढे पैसे आले आहेत तर नक्की कुणीतरी ते आणून दिले असेल. आणि मग ते गेले कुठे, हेही समजलं पाहिजे. तपास करून दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे.'

सध्या या व्हिडिओवरून राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. विरोधकांनी सरकारवर आरोपांची झोड उठवली असून, संजय शिरसाट यांनी हे कटकारस्थान असल्याचा दावा केला आहे. 
 


सम्बन्धित सामग्री