मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकीचे वेध सगळ्यांना लागले आहेत. अशातच आता राज ठाकरे आणि उद्धव छाकरे एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. बऱ्याच नेत्यांनीही ठाकरे बंधू एकत्र येण्यावर भाष्य केले आहे. पण या सर्व चर्चांवर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना फोन करावा असं म्हटल्यावर एका तासाभरातच उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसोबत युतीवर भाष्य केलं.
राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीवर अनेकवेळा चर्चा पाहायला मिळतात. मात्र यावेळी प्रथमच त्यांनी युतीवर प्रतिक्रिया केली आहे. जे जनतेच्या मनात ते होईल असं म्हणत, आता थेट बातमीच देऊ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले. त्यानंतर आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रात मोठ्या कालावधीनंतर दोन्ही ठाकरे बंधुंचा एकत्र फोटो पाहायला मिळाला.
हेही वाचा : पाकिस्तानात घुसखोरी करणाऱ्या सुनीताचा मानसिक परीक्षणासाठी कोर्टात अर्ज दाखल
आजच्या 'सामना' वृत्तपत्रात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो छापण्यात आला. मोठ्या कालावधीनंतर ठाकरे बंधूंचा फोटो सामना मुखपृष्ठात बघायला मिळाला. या फोटोवर ठाकरे म्हणाले, संदेश देणार नाही...बातमीच देतो...महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार, शिवसेना-मनसे युतीबाबत थेटच बोलले...सूर जुळणार! उत्सुकता वाढली, असंही म्हटलं आहे.
दरम्यान, आता ठाकरे बंधूंमध्ये युती होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येतील, यावर राजकीय वर्तुळात तर्क वितर्क पाहायला मिळत आहेत.