Wednesday, June 25, 2025 01:07:31 AM

वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणाची राजकीय नेत्यांकडून दखल; 'अशा नालायक आणि विकृत लोकांना शिक्षा झालीच पाहिजे'

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची सध्या महाराष्ट्र जोरदार चर्चा सुरु आहे. या प्रकरणात राजकीय नेतेमंडळींनी भाष्य केले आहे.

वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणाची राजकीय नेत्यांकडून दखल अशा नालायक आणि विकृत लोकांना शिक्षा झालीच पाहिजे

पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची सध्या महाराष्ट्र जोरदार चर्चा सुरु आहे. वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात राष्ट्रवादीचे पदाधिकारी असणारे राजेंद्र हगवणे सासरे, सासू, दीर, नणंद आणि नवऱ्यावर गुन्हा दाखल झाला असून सासू, नणंद आणि नवऱ्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात राजकीय नेतेमंडळींनी भाष्य केले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांवर बऱ्याच लोकांनी भाष्य केले. मात्र यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैष्णवी हगवणे प्रकरणात माझा काय संबंध? असा सवाल त्यांनी केला आहे. 

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात वैष्णवीचे सासरे राजेंद्र राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याने अजित पवारांवर टीका केली जात होती. पवारांनी अजून का मौन बाळगले आहे असेही म्हटले गेले. मात्र आता त्यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणात माझा काय संबंध? असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांची पाठराखण करताना पाहायला मिळाली. लग्नाला गेले म्हणून अजित पवार दोषी नाहीत अशा शब्दात बहीण सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांची बाजू घेतली आहे. ही आत्महत्या नाही हत्या असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी वैष्णवीच्या आत्महत्येवर म्हटले आहे. 

Vaishnavi Hagawane suicide case: राजेंद्र हगवणे यांची पक्षातून हकालपट्टी

राजकीय नेत्यांना असं करण्यासाठी प्रमाणपत्र दिलं जात नाही. अशा नालायक आणि विकृत लोकांना शिक्षा झालीच पाहिजे अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी कस्पटे कुटुंबीयांच्या भेटीनंतर  दिली आहे. तसेच वैष्णवीचा छळ माणुसकीला काळीमा फासणारा  आहे. हत्येच्या अँगलनं या प्रकरणाचा तपास होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. वैष्णवी हगवणे मृत्युप्रकरणी चौकशीचे आदेश राज्य महिला आयोगाकडून पुणे पोलिसांना देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात अजूनही हुंडाबळी सुरु आहे. दोषींना कठोर शिक्षा व्हायला हवी असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. 

राजेंद्र हगवणे पक्षाचे पदाधिकारी नाहीत. हगवणेंच्या मुलाची आधीच पक्षातून हकालपट्टी केली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. राजेंद्र हगवणे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. वैष्णवी हगवणेला न्याय मिळालाच पाहिजे असे राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांनी सांगितले आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी कस्पटे कुटुंबियांची भेट घेतली आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. 


सम्बन्धित सामग्री