Friday, May 16, 2025 12:48:51 PM

Pune MPSC Tution Class: परवानगीशिवाय चालणारे MPSC क्लासेस पोलिसांच्या रडारवर

परवाना नसताना व नियमांचे उल्लंघन करत चालवले जाणारे हे क्लासेस शहरातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

pune mpsc tution class परवानगीशिवाय चालणारे mpsc क्लासेस पोलिसांच्या रडारवर

पुणे: पुण्यात स्पर्धा परीक्षा तयारीसाठी उभारण्यात आलेले काही खासगी मार्गदर्शन वर्ग आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत. परवाना नसताना व नियमांचे उल्लंघन करत चालवले जाणारे हे क्लासेस शहरातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, ' पुण्यातील काही स्पर्धा परीक्षा क्लास चालकांकडून विविध नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे दिसून आले आहे. प्रामुख्याने स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांची सुरक्षितता न घेणे, अग्निशमक दल, महापालिका, स्थानिक पोलिसांची परवानगी नसणे, यासह विविध परवानगीची तपासणी मोहीम आम्ही सुरू केली आहे. 'कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता क्लासेस चालवले गेले, तर त्यांच्यावर थेट कायदेशीर कारवाई केली जाईल.' 

विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे क्लास चालकांचा हात?
चार दिवसांपूर्वी अलका चौकातील फारसखाना पोलिस ठाण्याच्या आवारात काही विद्यार्थ्यांनी मध्यरात्री आंदोलन केले होते. यामागे काही मार्गदर्शन वर्ग चालकांनीच विद्यार्थ्यांना प्रेरित केल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तातडीने कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे.त्यावर पोलिसांनी संबंधित क्लास चालकांची बैठक बोलावून, त्यांना कायदेशीर बंधनांची जाणीव करून देत, भविष्यातील संभाव्य कारवाईची सूचना दिली आहे.

काय आहेत पोलिसांचे मुद्दे?
विद्यार्थ्यांची सुरक्षा सुनिश्चित न करणे
अग्निशमन, महापालिका वा पोलिसांची परवानगी न घेणे
विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी प्रोत्साहन देणे
शासन धोरणांवर टीका करण्यासाठी विद्यार्थ्यांचा वापर
अशा प्रकारच्या अनेक बाबी लक्षात घेत, आता नियम तोडणाऱ्या संस्थांवर कडक कारवाई केली जाईल, असा ठाम निर्णय पोलिसांकडून घेण्यात आला आहे.

अनेक क्लास चालकांकडून विद्यार्थ्यांचा वापर केवळ स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी केला जात असल्याचेही पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी, आयोगांवर टीका यासाठी विद्यार्थ्यांना पुढे करून आंदोलने घडवून आणली जात आहेत, हे स्पष्ट होत आहे. यामुळे केवळ क्लास चालकच नव्हे, तर आंदोलन उकसवणाऱ्या इतर व्यक्तीही पोलिसांच्या तपासात सापडणार आहेत.
 


सम्बन्धित सामग्री