रत्नागिरी जिल्ह्यात पाणी टंचाईचं संकट; 5 तालुक्यांतील 14 हजाराहून अधिक ग्रामस्थांना फटका

रत्नागिरी जिल्ह्यातील 5 तालुक्यांतील 20 गावांमध्ये 14,789 नागरिक पाणीटंचाईचा सामना करत असून, प्रशासन टँकरद्वारे पाणीपुरवठा करत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात पाणी टंचाईचं संकट; 5 तालुक्यांतील 14 हजाराहून अधिक ग्रामस्थांना फटका

रत्नागिरी: उन्हाळ्याचे चटके वाढत असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा पाणीटंचाईचं संकट निर्माण झालं आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भूजल पातळी खालावल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, सध्या 5 तालुक्यांतील 20 गावांमधील तब्बल 53 वाड्यांमध्ये 14,789 ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने या टंचाईवर तातडीचा उपाय म्हणून शासकीय व खासगी टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू केला आहे.

रत्नागिरी, चिपळूण, खेड, गुहागर आणि संगमेश्वर हे पाच तालुके सध्या टंचाईग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या भागांतील बहुतांश गावे डोंगराळ, दुर्गम आणि विहिरींची पाणीपातळी कमी झालेली आहे. अनेक ठिकाणी नदी-नाल्यांमध्येही पाणी आटल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. लोकांना दररोज पाण्यासाठी किलोमीटरचे अंतर पार करावे लागत असून, महिला आणि वृद्धांचे हाल होत आहेत.

हेही वाचा: शिरूरमध्ये धर्मांतरासाठी आमिष; 7 जणांवर गुन्हा दाखल

जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन उपाययोजनांमध्ये वेग वाढवला असून, सध्या 40 हून अधिक शासकीय आणि खासगी टँकरद्वारे या गावांमध्ये पाणी पोहोचवले जात आहे. काही भागांमध्ये एका टँकरवर संपूर्ण वाड्याचा भार येत असल्याने पुरेसं पाणी मिळत नाही, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित तहसीलदारांना निर्देश दिले असून, पाणीटंचाईच्या गावांची यादी तयार करून त्याठिकाणी नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर जलजीवन मिशन, पंचायत राज आणि जलसंपदा विभागाच्या मदतीने दीर्घकालीन उपाययोजना राबवण्याची तयारी सुरू आहे. काही ठिकाणी बोअरवेलचे खोदकाम आणि विहिरींची सफाईही करण्यात येत आहे.

राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणेच कोकण विभागातही उष्णतेची तीव्रता वाढली असून, एप्रिल महिन्यापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली होती. मात्र, मेच्या सुरुवातीपासून परिस्थिती आणखीनच गंभीर झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आगामी काही दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होण्याचा धोका आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number