Raut's allegations against BJP: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपावर आणि गिरीश महाजन यांच्यावर घणाघाती टीका करत राजकीय वातावरण तापवले आहे. गिरीश महाजन हे पक्षफोड करण्यासाठी भाजपकडून नेमलेले दलाल आहेत, असे सांगत राऊत यांनी थेट आरोपच केला. यावेळी बोलताना राऊतांची जीभ घसरल्याचेही पाहायला मिळाले. 'ठाकरेंच्या काळात चौकशी लागली होती, त्यावेळी महाजन भाजप सोडणार होते,' असा गौप्यस्फोट त्यांनी केला. इतकेच नव्हे तर 'भविष्यात सत्ता आमच्याकडे आल्यावर भाजप सोडणारे पहिलेच गिरीश महाजन असतील,' अशी टीका करत त्यांनी भाजपच्या अंताची सुरुवात महाजनच करतील, असे विधान केले.
हेही वाचा: सिल्लोडमध्ये आगळंवेगळं आंदोलन; उपविभागीय अधिकाऱ्यांवर सोडले विंचू
पुढे बोलताना राऊत यांनी केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावरही तीव्र शब्दात टीका केली. 'आज जगामध्ये भारताची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. भारतासारख्या मोठ्या देशाला एकही खरा मित्रदेश शिल्लक राहिलेला नाही,' असा आरोप करत राऊत यांनी मोदी सरकारच्या विदेश धोरणाचे अपयश अधोरेखित केले. विशेष म्हणजे, खासदारांचे शिष्टमंडळ परदेशात गाणी म्हणत असल्याचे सांगत राऊत यांनी व्यंगात्मक टीका केली. 'शिष्टमंडळ नेमके कुठल्या उद्देशाने परदेशात गेले होते आणि काय दिवे लावले?' असा सवाल उपस्थित करत त्यांनी मिश्किल भाष्य केले.
नेपाळसारखा शेजारी देशही भारताच्या बाजूने उभा राहायला तयार नाही, अशी खंत राऊत यांनी बोलून दाखवली. ब्रह्मपुत्रा नदीवर चीनकडून मोठे धरण बांधले जात असल्याचे सांगत, भारताचे पाणी थांबवण्याची धमकी चीनकडून दिली जात असल्याचे राऊत म्हणाले. 'या प्रश्नाचे उत्तर आम्हाला विचारू नका, हे प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री किंवा महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना विचारा,' असा सल्ला पत्रकारांना दिला.
हेही वाचा: 'एफसीआरए' प्रमाणपत्र मिळवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य; परदेशी देणगीचा थेट रुग्णांना होणार लाभ
राऊत यांनी काँग्रेस संदर्भातही टोला लगावला. 'भाजपने काँग्रेस मुक्त भारताचा नारा दिला होता. पण त्यांच्या सत्ताकाळातच काँग्रेस अधिक बळकट झाली आहे. आता काँग्रेसचे खासदार परदेशात पाठवून भारताची बाजू मांडण्याची वेळ भाजपवर आली आहे,' अशी टिप्पणी करत त्यांनी भाजपच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
या सर्व टीकेतून संजय राऊत यांनी केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणाचे अपयश, देशाची आंतरराष्ट्रीय प्रतिमा, आणि भाजपच्या अंतर्गत गोंधळ यावर लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले असून, पुढील काळात भाजपकडून या आरोपांना काय उत्तर दिले जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.