पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पैशांअभावी वेळेवर उपचार न मिळाल्याने एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी राज्यात संतापाची लाट उसळली आहे. यानंतर सरकारकडून रूग्णालयाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आणि आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. गरीब रुग्णांसाठीचा 30 कोटींहून अधिकचा निधी वापरलाच नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. धर्मादाय विभागाने सादर केलेल्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. धर्मादाय विभागाने सरकारला अहवाल सादर केला आहे.
डिपॉझिट न भरल्याने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने उपचार करण्यास नकार दिल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने चौकशी करण्याचे आदेश दिले. या संदर्भात धर्मादाय विभागाने सरकारला अहवाल सादर केला. सरकारने दिलेल्या आदेशानंतर धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने रुग्णालयाला भेट देऊन अहवाल सादर केला. यामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून गरीब रुग्णांसाठीचा 30 कोटींहून अधिकचा निधी वापरलाच नसल्याचा ठपका अहवालातून ठेवण्यात आला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे.
हेही वाचा : लातूरमध्ये 17 कोटींचं ड्रग्ज सापडलं; प्रकरणात पोलिसाचा सहभाग उघड
धर्मादाय रुग्णालयात गरीब रुग्णांना उपचार दिले जातात की नाही हे पाहण्यासाठी धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने रुग्णालयाला भेट दिली. या भेटीनंतर शासनाला अहवाल सादर करण्यात आला. यामध्ये गरीब रुग्णांसाठीचा 30 कोटींहून अधिकचा निधी वापरलाच नसल्याचा समोर आले. राज्यात जवळपास 486 धर्मादाय रुग्णालये आहेत. ज्याद्वारे गरीब रुग्णांना चांगले उपचार मिळावे, यासाठी रुग्णालयांत विशिष्ट बेड्स आरक्षित असतात.