Sunday, July 13, 2025 10:45:13 PM

SSC 10th Result 2025: दहावीचा निकाल जाहीर; 500 पैकी 500 गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची विक्रमी संख्या

दहावी निकालात यंदा सरासरी टक्केवारीत घट झाली असली, तरी 211 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवत परफेक्ट स्कोअर केला. त्यामुळे अकरावीच्या कटऑफमध्ये घट होण्याची शक्यता आहे.

ssc 10th result 2025 दहावीचा निकाल जाहीर 500 पैकी 500 गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची विक्रमी संख्या

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यंदा पैकीच्या पैकी 500 पैकी 500 गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक; तब्बल 211 इतकी नोंदवण्यात आली आहे. ही बाब निश्चितच उल्लेखनीय असली तरी यंदाच्या निकालात एकूण टक्केवारीत थोडी घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येत्या अकरावी प्रवेश प्रक्रियेत, विशेषतः सामान्य कॉलेजमध्ये, पात्रता गुणांमध्ये (कटऑफमध्ये) दोन ते तीन टक्क्यांची घट होण्याची शक्यता शिक्षणतज्ज्ञांनी वर्तवली आहे.

राज्यभरातील विद्यार्थ्यांनी यंदा कष्ट घेतल्याचे चित्र निकालातून दिसत असले तरी, एकंदर यश टक्केवारी मागील वर्षांच्या तुलनेत किंचित कमी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे विविध शाखांमध्ये, विशेषतः कला, वाणिज्य व विज्ञान शाखांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सकारात्मक संधी ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, अकरावी प्रवेशासाठी स्पर्धा ही दरवर्षीप्रमाणे तीव्र असली, तरी यंदा मध्यम दर्जाच्या आणि निमशहरांमधील कॉलेजांमध्ये प्रवेश मिळवणे तुलनेने सोपे जाऊ शकते.

मात्र, दुसऱ्या बाजूला मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या महानगरांतील नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी नेहमीप्रमाणेच अटीतटीची स्पर्धा कायम राहणार आहे. याठिकाणी विज्ञान शाखेचे कटऑफ 90 टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता असून वाणिज्य व कला शाखेतीलही प्रवेशासाठी चांगले गुण आवश्यक असतील. त्यामुळे 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी आपल्याला हवे ते कॉलेज मिळवण्याच्या शर्यतीत राहतील.

दरवर्षीप्रमाणे यंदाही ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पार पडणार असून, विद्यार्थ्यांनी त्यासाठी योग्य वेळी आवश्यक कागदपत्रांची तयारी ठेवावी, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी आपले गुणपत्रक, जन्मतारीख, जातीचा दाखला (आवश्यक असल्यास), तसेच इतर महत्त्वाची कागदपत्रे तयार ठेवावीत.

पालक आणि विद्यार्थ्यांनी कटऑफ कमी झाल्याने अधिक संधी मिळणार असल्याचे समजून प्रवेश प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा काळजीपूर्वक पार पाडावा. त्याचबरोबर, कॉलेज निवड करताना फक्त नाव व प्रतिष्ठा पाहण्याऐवजी, त्या महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता, सोयी-सुविधा आणि आपले अभ्यासक्रमाशी सुसंगततेचा विचार करणे आवश्यक आहे.

दहावीचा निकाल हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. यंदाच्या निकालातून ‘परफेक्ट स्कोअर’ करणारे विद्यार्थी निश्चितच कौतुकास पात्र आहेत, मात्र इतर विद्यार्थ्यांनीही मिळवलेल्या गुणांच्या आधारे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढील वाटचाल करावी. अकरावी प्रवेश प्रक्रियेत सुस्पष्ट नियोजन, योग्य मार्गदर्शन आणि समजूतदार निवड हे यशस्वी प्रवेशाचे मुख्य सूत्र ठरणार आहे.


सम्बन्धित सामग्री