Sunday, August 17, 2025 05:10:41 PM

राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा; 22 हजार 879 हेक्टर क्षेत्राचं मोठं नुकसान

राज्यात गेल्या 15 दिवसांत अवकाळी पावसामुळे 21 जिल्ह्यांत 22,879 हेक्टरवरील पिकांचे नुकसान; अमरावती, जळगाव, नाशिक जिल्ह्यांत मोठा फटका.

राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा  22 हजार 879 हेक्टर क्षेत्राचं मोठं नुकसान

महाराष्ट्र: गेल्या 15 दिवसांत राज्यभरात पडलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या उमेदीवर पाणी फेरलं आहे. वादळी वारे, गारपीट आणि मुसळधार पावसामुळे सुमारे 22,879 हेक्टर क्षेत्रावर गंभीर परिणाम झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. राज्यातील 21 जिल्ह्यांतील 86 तालुक्यांना याचा फटका बसला असून अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

अमरावती जिल्हा सर्वाधिक बाधित झाला असून 10,636  हेक्टर क्षेत्रावर नुकसान झालं आहे. येथे मूग, संत्रा, कांदा, ज्वारी आणि केळी पिके प्रभावित झाली आहेत. त्यानंतर जळगाव जिल्ह्यात 4,396 हेक्टर क्षेत्रावर मका, बाजरी, कांदा, भाजीपाला आदींचे नुकसान झाले. नाशिक (1,734 हेक्टर), जालना (1,695 हेक्टर) आणि चंद्रपूर (1,038 हेक्टर) जिल्ह्यांत देखील नुकसान मोठ्या प्रमाणावर आहे.

पालघर (796 हेक्टर), धुळे (645), गडचिरोली (342), वाशिम (203), बुलडाणा (181), यवतमाळ (178), गोंदिया (143), भंडारा (75), नागपूर (42), परभणी (41), नंदुरबार (28), रायगड (17), पुणे (5) आणि ठाणे (1 हेक्टर) हे इतर बाधित जिल्हे आहेत.

हेही वाचा: तीन बाजूंनी पाकिस्तानने वेढलेलं पंजाबमधील दाओके गाव; तरीही गावकऱ्यांना भीती नाही..नेमकं काय आहे त्यांच्या निर्धास्तपणामागचं कारण

जालना, नाशिक, जळगाव, चंद्रपूर, अमरावती यांसारख्या जिल्ह्यांत विशिष्ट तालुक्यांमध्ये प्रचंड फटका बसलेला आहे. अमरावतीतील अचलपूर, चांदूरबाजार, चिखलदरा हे तालुके विशेषतः बाधित झाले आहेत. नाशिकमधील सिन्नर, निफाड, मालेगाव, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर; जळगावमधील चाळीसगाव, जामनेर, मुक्ताईनगर, रावेर; तर जालनामधील अंबड, मंठा, परतूर या तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.

फळपिकांमध्ये आंबा, संत्रा, पपई, केळी यांचं मोठं नुकसान झालं आहे. तसंच भात, मका, बाजरी, कांदा, मूग, उडीद, भुईमूग आणि भाजीपाला यांसारख्या पिकांनाही फटका बसला आहे.

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले की, नुकसानग्रस्त भागांमध्ये पंचनामे सुरू असून अहवाल आल्यानंतर शासनाच्या धोरणानुसार नुकसान भरपाई देण्यात येईल.

शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडले असून शासनाने तत्काळ मदतीचे पावले उचलणे अत्यावश्यक आहे. अवकाळी पावसाचा धोका लक्षात घेता हवामान अंदाजावर आधारित संरक्षण योजनांची अंमलबजावणीही यापुढे अधिक प्रभावी करणे गरजेचे ठरत आहे.


सम्बन्धित सामग्री