मुंबई: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, राज्यातील एकूण 130 पुरस्कारार्थ्यांची निवड या पुरस्काराकरिता करण्यात आलेली आहे. त्यामध्ये 90 व्यक्ती व 40 संस्थांचा समावेश आहे. या पुरस्कारांचे वितरण दिनांक 10 जून 2025 रोजी सकाळी 10 वाजता मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ तसेच अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सन 2023-24 या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार, कर्मवीर पद्मश्री दादासाहेब भाऊराव कृष्णराव गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहु, फुले, आंबेडकर पारितोषिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रावीण्य पुरस्कार या विविध पुरस्कारांची शासनाने घोषणा केली आहे.
हेही वाचा : भावे सभागृह धोकादायक असूनही सरकारी कामं सुरूच; कर्मचारी आणि नागरिकांचा जीव धोक्यात
या पुरस्कारासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. पुरस्कारासाठी निवड झालेल्या व्यक्तींना मुंबई येथे कार्यक्रम ठिकाणी घेऊन येण्यासाठी संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. पुरस्कारार्थी यांची निवास,भोजन व मुंबई दर्शनाची व्यवस्था शासनाच्या वतीने करण्यात आली आहे. राज्यातील विभागाचे समाज कल्याण अधिकारी प्रत्यक्ष पुरस्कारार्थी यांच्या घरी जाऊन त्यांचे अभिनंदन करत आहेत.
जाहीर करण्यात आलेल्या पुरस्कार प्राप्त व्यक्ती व संस्था यांची माहिती पुढीलप्रमाणे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार 61 व्यक्ती- (प्रत्येकी 75 हजार), व 10 संस्था ( प्रती संस्था प्रत्येकी 1 लाख) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार 27 व्यक्ती- (प्रत्येकी 75 हजार) व 6 संस्था ( प्रती संस्था प्रत्येकी 1 लाख). कर्मवीर पद्मश्री दादासाहेब भाऊराव कृष्णराव गायकवाड पुरस्कार 1 व्यक्ती- (प्रत्येकी 51 हजार ), व 1 संस्था ( प्रती संस्था प्रत्येकी 1 लाख). संत रविदास पुरस्कार 1 व्यक्ती -(प्रत्येकी 51 हजार), व 1 संस्था ( प्रती संस्था प्रत्येकी 1 लाख). शाहु, फुले, आंबेडकर पारितोषिक एकूण 14 संस्थेला 6 महसुली विभागानूसार प्रत्येकी दोन संस्था 7.50 लाख सन्मानपत्र, मानपत्रासाठी चांदीचा स्क्रोल,स्मृतीचिन्ह , शाल, व श्रीफळ. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रावीण्य पुरस्कार 8 संस्था , राज्यस्तर 3 पुरस्कार प्रथम पुरस्कार 5 लाख, द्वितीय पुरस्कार 3 लाख व तृतीय पुरस्कार 2 लाख विभागीय स्तरावर पुरस्कार संख्या 5, प्रत्येकी 1 लाख याप्रमाणे राज्यातील 90 व्यक्ती व 40 संस्थांचा एकूण 130 पुरस्कारार्थ्यांची निवड या विविध पुरस्काराकरीता करण्यात आलेली आहे.