मुंबई : संसदेत आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात विविध घोषणा करण्यात आल्या. यावर राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
'सर्वसामान्यांचं स्वप्न पूर्ण करणारा अर्थसंकल्प'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. सर्वसामान्यांचं स्वप्न पूर्ण करणारा अर्थसंकल्प असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. अर्थसंकल्पाचे भरभरून कौतुक पंतप्रधानांनी केले आहे.
हेही वाचा : BUDGET 2025 : मोदी सरकारकडून तरूण उद्योजकांसाठी मोठी संधी
'देशाच्या आर्थिक विकासात एक मैलाचा दगड ठरेल'
केंद्रीय मंत्री निर्मला सितारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अर्थसंकल्पातून शेतकरी, तरुण, मध्यम वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. मध्यम वर्गासाठी ड्रीम बजेट म्हणता येईल असं फडणवीस म्हणाले आहेत. हा अर्थसंकल्प देशाच्या आर्थिक विकासात एक मैलाचा दगड ठरेल. मासेमारी करणाऱ्यांना याचा फायदा होणार आहे अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे.
'विकासाची खात्री देणारा अर्थसंकल्प'
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अर्थसंकल्पाचं कौतुक केलं आहे. विकासाची खात्री देणारा अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : BUDGET 2025 : अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा कोणत्या?
लक्ष्मीच्या पाऊलखुणा उमटल्या...
देशाचे लोकप्रिय आणि कर्तृत्ववान पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींनी विकसित भारताचं पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात येणार, याची खात्री देणारा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पात सामान्य नोकरदार वर्गाला जो दिलासा मिळालाय, त्याचं वर्णन अभूतपूर्व असंच करावं लागेल. १२ लाखापर्यंतच्या उत्पन्नावर संपूर्ण करमुक्ती मिळाल्याने आता घराघरात लक्ष्मीची पावलं उमटल्याशिवाय राहणार नाहीत. एक सर्वांगसुंदर, आत्मनिर्भर भारताला सबळ करणारा हा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल मी आदरणीय केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन करतो, आणि महाराष्ट्रातल्या तमाम नोकरदारांतर्फे त्यांचे आभारही मानतो असे शिंदेंनी म्हटले आहे.
शिक्षण, आरोग्य आणि कृषी या तिन्ही महत्त्वाच्या क्षेत्रांना अर्थसंकल्पातील कल्पक तरतुदींचा लाभ होणार असल्याने देशाच्या प्रगतीचा आलेख अधिकाधिक उंचावत जाणार यात शंकाच नाही. हा सशक्त भारताचा रोडमॅप आहे. दुरवस्था संपवून पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्त्वात आपला भारत देश सुबत्तेच्या दिशेनं वाटचाल करु लागल्याची ही शुभचिन्हे आहेत असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.
'अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील पायाभूत प्रकल्पांना भरीव निधी'
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात घेतलेल्या निर्णयांचं स्वागत करतो. केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील पायाभूत प्रकल्पांना भरीव निधी मिळाला असून त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे जाहीर आभार मानतो असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. तसेच ही विकसित राष्ट्रासाठीची, महासत्तेच्या वाटेवरील आधुनिक भारताच्या निर्मितीसाठीची मजबूत पायाभरणी आहे. देशाला विकसित भारत, आर्थिक महासत्ता बनवण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या प्रयत्नांना महाराष्ट्र संपूर्ण सहकार्य करेल. प्रधानमंत्र्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र संपूर्ण योगदान देईल असेही त्यांनी म्हटले आहे.
'अर्थसंकल्प शेतकरी आणि जनताविरोधी'
आज संसदेत अर्थमंत्री सितारमण यांनी अर्थसंकल्प मांडला. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अर्थसंकल्प शेतकरी आणि जनताविरोधी असल्याची टीका त्यांनी अर्थसंकल्पावर केली आहे.
हेही वाचा : अर्थसंकल्प सादर करताना काय म्हणाला निर्मला सितारमण?
'शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार'
अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी काहीही ठोस उपाययोजना नाहीत. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनात खर्चापेक्षा 50 टक्के अधिक रक्कम देण्यासाठी सरकारने तरतूद करणे गरजेचे असताना तशी तरतूद केली नाही. हा शेतकऱ्यांच्या तोंडाला सरकारने पाणी पुसल्या असल्याचा आरोप रविकांत तुपकर यांनी केला आहे.