मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात अनेक नवनवीन घडामोडी घडत आहेत. 'हिंदी सक्ती'ला विरोध करण्यासाठी ठाकरे बंधूंनी मोर्चा करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. अशातच, मंगळवारी संध्याकाळी वरळी येथील राष्ट्रीय क्रीडा संकुलात चव्हाण यांचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी नाव न घेता ठाकरेंना टोला लगावला. 'निवडणुकीवेळी विरोधकांना मराठी माणसांची आठवण येते. मराठीचा वापर फक्त राजकारणासाठी केला जात आहे', अशी टीका फडणवीसांनी केली.
हेही वाचा: RAVINDRA CHAVAN: भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड
नाव न घेता फडणवीसांनी लगावला ठाकरेंना टोला
'या महाराष्ट्रात सक्ती एकच आहे ती म्हणजे मराठी. मराठी शिकावीच लागेल. त्याचबरोबर आम्हाला हिंदीचाही अभिमान आहे. भारतातील प्रत्येक भाषेचा आम्हाला अभिमान आहे. पण इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि भारतीय भाषाला विरोध करायचा हे आम्ही सहन करणार नाही. समिती स्थापन केली आहे, कोणाच्याही दबाबावाल बळी न पडता महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेऊ', असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. 'भाजपचं सरकार आल्यानंतर आम्ही मुंबईचा चेहरा बदलला. पण तुम्ही मुंबईतील मराठी माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं', नाव न घेता फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
हेही वाचा: शक्तिपीठ महामार्ग लोकांची की सत्ताधाऱ्यांची गरज? - बच्चू कडू
मराठीच्या नावावर राजकारण
'तुम्ही केवळ मराठीच्या नावावर राजकारण करत राहिलात. पण त्या मराठी माणसाला घर देणारे आम्ही आहोत. बीबीडी चाळमध्ये आम्ही त्यांना घर दिले. धारावीमधील गरिब माणसाला घर देणारे आम्ही आहोत. निवडणुका आल्यानंतर यांना मराठी माणूस आठवतो. आपण जे केले त्याच्याच विरोधात बोलायचं आणि जिंकलो असं सांगायचं', असे म्हणत फडणवीसांनी ठाकरेंना टोला लगावला. 'नवीन शैक्षणिक धोरणासाठी उद्धव ठाकरेंच्या सरकारने जी समिती स्थापन केली होती, त्या समितीने पहिलीपासून 12 वी पर्यंत मराठीसोबत हिंदी आणि इंग्रजी सक्तीची करा हे उद्धव ठाकरेंच्या समितीने सांगितलं', अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली.