Sunday, August 17, 2025 12:35:25 AM

लातूरमधील रस्ता एका रात्रीत गायब झाल्याने अधिवेशनात तीव्र पडसाद; महसूल मंत्र्यांनी दिले कारवाईचे संकेत

लातूरातील जय तुळजाभवानी नगरातील 25-30 वर्षांपासूनचा एक मुख्य रस्ता लातूर शहर महानगरपालिकेच्या नगररचनाकार व तत्कालीन महापालिका आयुक्त यांनी चुकीच्या पद्धतीने जमिनीचे रेखांकन करून एका रात्रीत बंद केला.

लातूरमधील रस्ता एका रात्रीत गायब झाल्याने अधिवेशनात तीव्र पडसाद महसूल मंत्र्यांनी दिले कारवाईचे संकेत

अजय घोडके, प्रतिनिधी, लातूर: अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या 'जाऊ तिथे खाऊ' या मराठी चित्रपटात विहीर चोरीला गेल्याचा प्रकार आपण पाहिला होता. अगदी तसाच एक प्रकार लातूर शहरात घडल्याचे समोर आले असून याचे पडसाद राज्याच्या पावसाळी अधिवेशनात उमटले आहेत. 

लातूर शहरातील जय तुळजाभवानी नगरातील 25-30 वर्षांपासूनचा एक मुख्य रस्ता लातूर शहर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाचे नगररचनाकार निकिता भांगे व तत्कालीन महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी चुकीच्या पद्धतीने जमिनीचे रेखांकन करून एका रात्रीत बंद केला आहे. त्यामुळे रस्त्याविना जवळपास 5000 नागरिकांची गैरसोय होत असून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जय तुळजाभवानी नगरातील नागरिकांनी महापालिका प्रशासन, जिल्हा प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन आपली कैफियत मांडली आहे. आता याच गंभीर विषयांचे पडसाद राज्याच्या पावसाळी अधिवेशनात उमटले आहेत. लातूर शहराचे काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाच्या अजब कारभारावर सवाल उपस्थित केला आहे. तसेच आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शंका विधिमंडळात उपस्थित केली आहे.

हेही वाचा: पक्षातील कोणीही 'या' माध्यमांशी संवाद साधायचा नाही; राज ठाकरेंचा स्पष्ट आदेश

राज्याच्या पावसाळी अधिवेशनात सलग दोन दिवस या विषयावर चर्चा झाल्यानंतर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लातूर शहर महानगरपालिकेच्या अजब कारभाराची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे लातूर शहर महानगरपालिकेच्या नगररचनाकार निकिता भांगे व तत्कालीन महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्यासह अन्य किती दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार? याकडे लातूरकरांचे लक्ष लागले आहे.


सम्बन्धित सामग्री