मुंबई : महायुती सरकारने लाडकी बहिण योजनेंतर्गत गरिब कुटुंबातील महिलाना मोफत साडी वाटपाची घोषणा केली आहे. या निर्णयानुसार पात्र महिलांना दरवर्षी एक साडी दिली जाणार आहे. मात्र, या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जबाबदारी सोपवलेल्या काही रास्त धान्य दुकानदारांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे ही घोषणा रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांसाठी साडी वाटप योजना आणली आहे. राज्यातील गरीब आणि गरजू महिलांना मदतीचा हात देण्यासाठी हा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले असून येणाऱ्या होळीच्या सणापर्यंत या साड्यांचे वाटप केले जाणार आहे.
हेही वाचा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान
सरकारचे आदेश
26 जानेवारी ते 13 मार्च या कालावधीत साडी वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. अंत्योदय कुटुंबातील प्रत्येक एका लाभार्थी महिलेला साडीचे वाटप केले जाणार आहे. नागपूर शहरात एकूण 45 हजार 912 अंत्योदय लाभार्थी आहेत. रास्त धान्य दुकानदाराना प्रती साडी वाटपावर 5 रुपयाची सबसिडी दिली जाणार आहे.
या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वस्त्रोद्योग विभाग आणि अन्न-नागरी पुरवठा विभाग समन्वय साधणार आहेत. राज्य यंत्रमाग महामंडळ तालुका स्तरावरील गोदामांपर्यंत साड्या पोहोचवणार असून, त्यानंतर स्वस्त धान्य दुकानांमार्फत लाभार्थींना साड्या वितरित केल्या जाणार आहेत. या निर्णयाबाबत रास्त धान्य दुकानदारांनी साडी वाटप न करण्याचा निर्णय घेतल्याने सरकारची ही साडी वाटप योजना रखडण्याची शक्यता आहे.