सौदी अरेबिया: सौदी अरेबियातील तैफजवळील हादा भागातील ग्रीन माउंटन अॅम्युझमेंट पार्कमध्ये एक भयावह घटना घडली. पार्कमधील ‘360 अंश’ राईडचा झूला अचानक तुटून जमिनीवर पडला. या अपघातात किमान 23 जण गंभीर जखमी झाले. द खलीज टाईम्सच्या वृत्तानुसार, लोक पार्कमध्ये या झूल्याचा आनंद घेत होते. झूला पेंडुलमसारखा पुढे-मागे हलत होता, तेव्हा अचानक तो मध्येच जमिनीवर पडला. या अपघाताचा भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
‘360 अंश’ राईड झूल्याचा अपघात कॅमेऱ्यात कैद -
व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की झूल्यावर बसलेले लोक झुल्याचा आनंद घेत आहेत. तेवढ्यात एक जोराचा आवाज होतो आणि झूला खाली कोसळतो. झुला पडताना लोक घाबरून ओरडतात. या झूल्याची रचना पेंडुलमप्रमाणे होती. तांत्रिक बिघाडामुळे झूला नियंत्रित न राहता जमिनीवर आदळला.
हेही वाचा - 170 तास भरतनाट्यम सादरीकरण! मंगळुरूच्या युवतीची 'गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद
द खलीज टाईम्सच्या अहवालानुसार, अपघाताच्या ठिकाणी आपत्कालीन सेवा आणि सुरक्षा यंत्रणा तात्काळ दाखल झाल्या. जखमींना तत्काळ प्राथमिक उपचार देण्यात आले. तसेच गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. झूल्याचा खांब मागच्या बाजूला फिरून काही उभ्या लोकांना धडकला आणि नंतर संपूर्ण यंत्रणा कोसळली.
पार्कमधील सर्व राईड्स तपासणी -
या दुर्घटनेनंतर संबंधित प्रशासनाने मनोरंजन पार्कमधील सर्व राईड्स तात्पुरत्या बंद करण्यात आल्या. सध्या अधिकाऱ्यांकडून संपूर्ण पार्कची सुरक्षा तपासणी सुरू आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी बिघाडाचे नेमके कारण शोधले जात आहे.
हेही वाचा - भूकंपाच्या हादऱ्यांनाही हरवता आलं नाही डॉक्टरांचं धैर्य! रशियन डॉक्टरांचा धाडसी व्हिडिओ व्हायरल
सौदीतील या घटनेनंतर, यासारखाच एक अपघात दिल्लीत घडला होता. फन एन फूड वॉटर पार्क येथे घडलेल्या अपघातात एका 24 वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागला होता. सुरक्षेच्या दृष्टीने मनोरंजन पार्कमधील यंत्रणा वेळोवेळी तपासणे, योग्य मेंटेनन्स करणे, आणि आपत्कालीन उपाय योजना तयार ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.