नवी दिल्ली : भारतात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) हॅक होण्याची शक्यता नाही, असा ठाम दावा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केला आहे. ईव्हीएम हॅक होण्यासंदर्भातील सर्व आरोप निवडणूक आयोगाने खंडण केले आहेत. याबाबत टेस्ला आणि स्पेसएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी वक्तव्य केले होते, त्याला प्रत्युत्तर देताना राजीव कुमार यांनी भारतात ईव्हीएम हॅक होणे अशक्य असल्याचे स्पष्ट केले.
इलॉन मस्कचा काय आहे आरोप ?
इलॉन मस्क यांनी 15 जून 2024 रोजी एक पोस्ट केली होती, ज्यात त्यांनी भारतातील लोकसभा निवडणुकीनंतर ईव्हीएम हॅक होण्याच्या शक्यतेचा इशारा दिला होता. मस्क यांच्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले होते की, "ईव्हीएमचा वापर बंद करायला हवा, कारण हे यंत्र एखाद्या व्यक्ती किंवा आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या सहाय्याने हॅक केले जाऊ शकते."
या आरोपानंतर भारतातील विरोधकांनी ईव्हीएमच्या वापरावर तीव्रपणे टीका केली आणि 'ईव्हीएम हटावो, देश बचाओ' अशी मोहीम राबवली. विरोधकांचा आरोप होता की ईव्हीएममध्ये सत्ताधाऱ्यांकडून छेडछाड केली जात आहे आणि यामुळे भाजपाला विजय मिळविणे सोपे झाले आहे.
राजीव कुमार यांच स्पष्टीकरण
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, "भारताच्या निवडणूक प्रक्रियेत ईव्हीएम हॅक होण्याची शक्यता नाही." त्यांनी सांगितले की, भारतातील ईव्हीएम मशीन्स इंटरनेटला कनेक्ट होत नाहीत, त्यामुळे त्यात कोणतीही छेडछाड करणे शक्य नाही. "जे आरोप केले जात आहेत, ते खरे नाही," असे राजीव कुमार म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
यापूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने देखील ईव्हीएम हॅक होण्यासंदर्भातील विरोधकांच्या सर्व दाव्यांना फेटाळून लावले होते. न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेसाठी ईव्हीएमचा वापर आणि त्याची सुरक्षितता कायम ठेवण्याच्या निर्णयाची पुष्टी केली होती.
ईव्हीएमवरून विरोधकांकडून करण्यात आलेले आरोप नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहेत. तरीही, निवडणूक आयोगाने आणि न्यायालयाने त्याला विरोध करून भारतातील निवडणूक प्रक्रियेवर विश्वास व्यक्त केला आहे.
ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र