न्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिकोवर लादलेली आयातशुल्काची अंमलबजावणी एका महिन्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय सोमवारी घेतला. मेक्सिकोमधून अमेरिकेत होणारी बेकायदा अंमली पदार्थ, विशेषतः फेंटानिलची तस्करी रोखण्यासाठी उत्तर सीमेवर १० हजार नॅशनल गार्ड तैनात करण्याचे मेक्सिकोने मान्य केल्यानंतर ट्रम्प यांनी हा निर्णय घेत असल्याचे सांगितले. त्यानंतर मेक्सिकोचे पेसो हे चलन दिवसभरातील पडझडीनंतर वधारले.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन, कॅनडा आणि मेक्सिको या तीन देशांवर आयात शुल्क लादण्याचा निर्णय घेतला होता. ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोवर प्रत्येकी 25 टक्के आणि चीनवर 10 टक्के आयात शुल्क लादण्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली. यानंतर आशियाई बाजारात सध्या मोठी घसरण दिसून आली. जपानचा निक्केई निर्देशांक, दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक घसरला.
हेही वाचा - World Cancer Day : धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका वाढला! 'हे' आहे भयावह स्थितीचं कारण
याशिवाय, ट्रम्प यांच्या निर्णयानंतर, कॅनडाचे हंगामी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनीही 155 अब्ज डॉलर्सच्या अमेरिकन वस्तूंच्या आयातीवर 25 टक्के शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. या टॅरिफ (आयात शुल्क) वॉरमुळे जगभरातील बाजारपेठांमध्ये मोठी घसरण दिसून येत आहे.
दरम्यान, ट्रम्प यांनी मेक्सिकोसह कॅनडा आणि चीनवर आयातशुल्क लादण्याचे आणि त्याची अंमलबजावणी मंगळवारपासून सुरू करण्याचा निर्णय रविवारी जाहीर केल्यानंतर सोमवारी जागतिक बाजाराला हादरे बसले. त्यामध्ये पेसोने तीन वर्षांचा नीचांक गाठला. महिनाभराची उसंत मिळाल्यानंतर मेक्सिकोच्या अध्यक्ष क्लॉडिया शीनबॉम यांनी समाजमाध्यमांवर जाहीर केले की, आजपासून आमचे सहकारी सुरक्षा आणि वाणिज्य या दोन क्षेत्रांवर काम करायला सुरुवात करतील.
हेही वाचा - सानिया मिर्झाने दुबईतील घरातून शोएब मलिकचं नाव हटवलं, आता लिहिलंय 'या' व्यक्तीचं नाव
आयातशुल्काच्या निर्णयाची अंमलबजावणी होण्याच्या काहीच तास आधी ट्रम्प आणि शीनबॉम यांच्यादरम्यान सोमवारी दूरध्वनीवरून संभाषण झाले. त्यावेळी अमेरिका आणि मेक्सिकोदरम्यान झालेल्या सहमतीनुसार, मेक्सिकोत अमेरिकेतून होणारी आधुनिक शस्त्रांची तस्करी रोखण्यासाठी कृती करण्याचे अमेरिकेने मान्य केले आहे, असे शीनबॉम यांनी एक्सवर लिहिले. तर, हा महिनाभराचा काळ दोन्ही देश पुढील वाटाघाटी करण्यासाठी वापरतील असे ट्रम्प यांनी सांगितले.
अमेरिकाबरोबरचा करार मेक्सिकोसाठी अतिशय सकारात्मक असल्याचे दिसते असे आरबीसी ग्लोबल असेट मॅनेजमेंटच्या अधिकाऱ्याने सांगितले. यामुळे वाटाघाटी करण्याची संधी मिळाली आहे असे ते म्हणाले.
कॅनडा, चीनला अद्याप दिलासा नाही
मेक्सिको व अमेरिकेदरम्यान करार झाल्यानंतर कॅनडाचीही आयातशुल्क लादले न जाण्याची आशा वाढली आहे. दिवसभरात कॅनडाच्या डॉलरने २२ वर्षांतील नीचांकी घसरण झाली होती. मात्र, मेक्सिकोप्रमाणे कॅनडालाही अमेरिकबरोबर सहमतीची आशा निर्माण झाल्यामुळे कॅनडाचा डॉलर पुन्हा सुधारला. दरम्यान, अमेरिकेचा अमेरिकेचा आयातशुल्काचा निर्णय कायम राहिल्यास, तसेच प्रत्युत्तर देऊ, असे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी सांगितले. तर, चीनचे वैध हक्क आणि हितसंबंध यांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ते प्रतिउपाय केले जातील असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी जाहीर केले.
युरोपीय महासंघालाही इशारा युरोपीय महासंघावरही (ईयू) आयातशुल्क लादले जाईल असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी फ्लोरिडा येथील एका कार्यक्रमात सूचित केले. मात्र, हे आयातशुल्क कधी लादणार ते त्यांनी स्पष्ट केले नाही. दुसरीकडे, अशा कोणत्याही निर्णयाविरोधात लढा दिला जाईल असे उत्तर युरोपच्या नेत्यांनी सोमवारी दिले. ‘ईयू’च्या ब्रुसेल्स येथील मुख्यालयात सोमवारी अनौपचारिक बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये या संभाव्य संकटावर उपाय शोधण्यासाठी चर्चा करण्यात आली.