लातूर: लातूरमधील एचआयव्ही बाधित मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी सेवालय प्रमुख रवी बापटलेसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्यावर बलात्कार झालाच नाही, माझ्याविरोधात विरोधकांचं षडयंत्र सुरु असल्याचा दावा सेवालय प्रमुख रवी बापटलेने केला आहे.
लातूरच्या हासेगाव येथील सेवालयातील एका 17 वर्षीय एचआयव्ही (HIV) बाधित तरुणीवर सेवालयातील एका कर्मचाऱ्याकडून गेल्या 2 वर्षापासून लैंगिक अत्याचार करून गर्भपात केल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. यानंतर औसा पोलिसांनी रवी बापटले, रचना बापटले, अमित महामुनी, पूजा वाघमारे या चार आरोपीना अटक केली आहे. परंतु पीडित अल्पवयीन मुलीने बलात्काराचे केलेले आरोप बिनबुडाचे असून सेवालय बंद पाडण्यासाठी विरोधकांनी केलेले हे षडयंत्र असल्याचा दावा सेवालयाचे प्रमुख रवी बापटले यांनी केला असून याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे.
हेही वाचा: Maharashtra Rain Live Update: राज्यात पावसाचा जोर वाढला; कोणत्या जिल्ह्याला, कुठला अलर्ट?, जाणून घ्या.
सेवालय बालगृहातील कर्मचाऱ्याने 17 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली. ही घटना मुलीने संचालकांना सांगूनही सेवालयाची बदनामी होऊ नये. म्हणून संचालकांनी प्रकरण समोर आणले नाही. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. प्रकरणातील मुख्य आरोपी फरार असून तो लातूरच्या बाहेर आहे. त्याला शोधण्याचं काम सुरु आहे. लातूरमधील बलात्कार प्रकरणी रवी बापटले, रचना बापटले, अमित महामुनी, पूजा वाघमारे या आरोपींना अटक करण्यात आली आहे असे लातूर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सांगितले.
आम्ही गेल्या 17 वर्षांपासून एचआयव्ही संक्रमित अनाथ मुलीचे बालगृह चालवत आहोत. अनेकांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. आता हा प्रकल्प बंद करण्यासाठी 17 वर्षीय मुलीचा बलात्कार झाल्याचे खोटे सांगितले जात आहे. अमित महामुनी या कर्मचाऱ्याने मुलीचा बलात्कार केल्याचे सांगितले जात आहे. मात्र महामुनी हा येथील कर्मचारी नाही. तोही सेवालयात राहायला होता आणि त्याने बलात्कार केला नाही. 17 वर्षीय मुलगी धाराशिव येथे तिच्या आजी आजोबांकडे राहायला गेली. तिच्या गोळ्या संपल्या म्हणून आम्ही तिला बोलावत होतो. ती येत नव्हती. लातूर येथील सेवालय बालगृहावर खोटे आरोप करुन ते बंद करण्याचा खोटा डाव आखला जात आहे, हे षडयंत्र आहे असे सेवालय प्रमुख रवी बापटले यांनी सांगितले.