नवी दिल्ली: भारतातील अमूल ब्रँडसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. ब्रिटीश ब्रँड फायनान्स या ब्रँड व्हॅल्युएशन आणि स्ट्रॅटेजी कन्सल्टन्सी कंपनीच्या नवीन अहवालात, अमूलला भारतातील नंबर 1 फूड ब्रँड घोषित करण्यात आले आहे. या यादीत मदर डेअरीला दुसरे स्थान मिळाले आहे. अहवालानुसार, अमूलचे ब्रँड व्हॅल्यू सुमारे 4.1 अब्ज डॉलर, तर दिल्ली-एनसीआर स्थित मदर डेअरीचे मूल्य 1.15 अब्ज डॉलर नोंदवण्यात आले आहे.
'हे' आहेत भारतातील टॉप 5 फूड ब्रँड -
ब्रँड फायनान्स इंडिया 100 च्या 2025 च्या अहवालात अमूलने सलग दुसऱ्या वर्षी अव्वल स्थान कायम ठेवले आहे. त्याच वेळी, मदर डेअरीने गेल्या वर्षीच्या तिसऱ्या क्रमांकावरून या वर्षी दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तथापी, यात ब्रिटानिया तिसऱ्या क्रमांकावर, कर्नाटकच्या दुग्ध सहकारी नंदिनी चौथ्या क्रमांकावर आणि डाबर पाचव्या क्रमांकावर आहे.
हेही वाचा - शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! पुरामुळे पिकांचे नुकसान झाल्यास केंद्र सरकार देणार भरपाई
दरम्यान, सर्व उद्योगांच्या टॉप 100 ब्रँडच्या यादीत अमूल 17 व्या क्रमांकावर आहे. मदर डेअरीनेही या यादीत सुधारणा केली आहे. 2024 मध्ये मदर डेअरी 41 व्या क्रमांकावर होती. परंतु आता कंपनीने 35 व्या स्थानावर झेप घेतली आहे. अमूलची मार्केटिंग संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक जयन मेहता आणि मदर डेअरीचे एमडी मनीष बंदलीश यांनी या यशाचे श्रेय देशातील लाखो दुग्ध उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांना दिले आहे.
हेही वाचा - देशातील IIT, IIM, AIIMS आणि NID संस्थांचा UGC च्या डिफॉल्टर यादीत समावेश; काय आहे यामागचं कारण?
अमूल ही जगातील सर्वात मोठी शेतकरी-मालकीची दुग्ध सहकारी संस्था आहे, ज्याच्याशी 36 लाखांहून अधिक शेतकरी जोडलेले आहेत. अमूल दररोज सुमारे 32 दशलक्ष लिटर दूध गोळा करते आणि दरवर्षी अमूल उत्पादनांचे 24 अब्ज पेक्षा जास्त पॅक वितरित करते. अमूलची उत्पादने 50 हून अधिक देशांमध्ये उपलब्ध आहेत, ज्यात दूध, लोणी, तूप, आईस्क्रीम आणि चीज यांचा समावेश आहे.