Saturday, June 14, 2025 04:26:30 AM

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने Amazon, Flipkart, Etsy आणि इतर कंपन्यांना नोटीस बजावली

पाकिस्तानच्या झेंड्याची विक्री करणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांना केंद्र सरकारने नोटीस बजावली असून देशविरोधी वस्तू हटवण्याचे निर्देश दिले आहेत.

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने amazon flipkart etsy आणि इतर कंपन्यांना नोटीस बजावली

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मना कडक इशारा दिला आहे. अमेझॉन (Amazon), फ्लिपकार्ट (Flipkart), यूबाय इंडिया (YouBuy India), एट्सी (Etsy) आणि द फ्लॅग कंपनी (The Flag Company) या कंपन्यांना नोटीस बजावत पाकिस्तानी राष्ट्रध्वजाची विक्री करणाऱ्या वस्तू तात्काळ प्लॅटफॉर्मवरून हटवण्याचे निर्देश दिले आहेत.

केंद्र सरकारच्या मते, या उत्पादनांची विक्री देशविरोधी भावना वाढवणारी असून, भारताच्या सार्वभौमत्वावर आणि एकात्मतेवर घात करणारी आहे. उद्योग व अंतर्गत व्यापार विभागाने या बाबत तातडीने दखल घेत ई-कॉमर्स कंपन्यांना नोटीस बजावली आहे. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर पाकिस्तानी झेंडे, बॅज, स्टिकर्स, टी-शर्ट्स आणि इतर वस्तू विक्रीस ठेवण्यात आल्या होत्या, ज्यामुळे अनेक ग्राहकांनी सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

नोटिशीत सरकारने स्पष्टपणे नमूद केले आहे की, देशविरोधी आणि भावनांना धक्का देणारी कोणतीही सामग्री विक्रीस ठेवणे हे अनधिकृत असून, अशा प्रकारच्या वस्तू तत्काळ हटवाव्यात. याशिवाय, भविष्यात अशा गोष्टींची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्लॅटफॉर्मने योग्य ती खबरदारी घ्यावी आणि यावर प्रभावी नियंत्रण ठेवावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

या घटनेनंतर Amazon व Flipkart यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. मात्र, उद्योग क्षेत्रात याचे पडसाद उमटले असून, यामुळे ऑनलाइन विक्रेत्यांनी देशाच्या कायद्याचे आणि जनभावनांचे भान ठेवणे गरजेचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, सोशल मीडियावरही या निर्णयाचे स्वागत होत असून, 'स्वदेशी' उत्पादनांना प्राधान्य देण्याचा सूर उमटत आहे. अनेकांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचे समर्थन करत, अशा विक्रीवर बंदी घालणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे.


सम्बन्धित सामग्री