भारतातील वाढत्या वायू प्रदूषणामुळे देशाचा श्वास गुदमरू लागला आहे. जगातील 20 सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी 13 एकट्या भारतात असून, यामध्ये सर्वात प्रदूषित शहर म्हणून आसाममधील बर्नीहाट पहिल्या स्थानी आहे. स्विस वायू गुणवत्ता तंत्रज्ञान कंपनी IQAir ने प्रसिद्ध केलेल्या “वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2024” नुसार, दिल्ली ही जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी असून, भारत संपूर्ण जगात पाचव्या क्रमांकाचा सर्वाधिक प्रदूषित देश ठरला आहे.
काय सांगते रिपोर्ट?
रिपोर्टनुसार, 2024 मध्ये भारतातील PM 2.5 प्रदूषणात 7% घट झाली आहे, तरीही परिस्थिती गंभीरच आहे. 2023 मध्ये भारतात PM 2.5 चं प्रमाण 54.4 माइक्रोग्राम प्रति घन मीटर होतं, जे 2024 मध्ये 50.6 माइक्रोग्राम प्रति घन मीटर एवढं कमी झालं आहे. मात्र, जगातील 10 सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी 6 शहरं भारतात आहेत. दिल्लीत हवेतील PM 2.5 प्रदूषणाची वार्षिक सरासरी 91.6 माइक्रोग्राम प्रति घन मीटर इतकी होती, जी 2023 मधील 92.7 च्या तुलनेत फारशी कमी झालेली नाही.
हेही वाचा: Chardham Yatra 2025: बद्रीनाथ-केदारनाथला जात आहात? आता मिळणार नाही व्हीआयपी पास किंवा व्हीव्हीआयपी दर्शन
भारताची 13 सर्वाधिक प्रदूषित शहरं
IQAir च्या अहवालानुसार, जगातील 20 सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी 13 भारतात आहेत, त्यामध्ये खालील शहरांचा समावेश आहे:
1. बर्नीहाट (आसाम)
2. दिल्ली
3. मुल्लानपूर (पंजाब)
4. फरीदाबाद
5. लोनी
6. नवी दिल्ली
7. गुरुग्राम
8. गंगानगर
9. ग्रेटर नोएडा
10. भिवाडी
11. मुजफ्फरनगर
12. हनुमानगड
13. नोएडा
भारतामध्ये वायू प्रदूषण हा गंभीर आरोग्याचा प्रश्न बनला आहे. एका अभ्यासानुसार, प्रदूषणामुळे भारतीयांचे सरासरी जीवनमान 5.2 वर्षांनी घटत आहे. लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ या नियतकालिकाने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, 2009 ते 2019 या कालावधीत भारतात दरवर्षी प्रदूषणामुळे 15 लाख मृत्यू झाले आहेत.
PM 2.5 म्हणजे काय?
PM 2.5 हे 2.5 माइक्रोन किंवा त्याहून कमी व्यासाचे अतिसूक्ष्म प्रदूषण कण असतात, जे फुफ्फुसांमध्ये शिरून रक्तप्रवाहात प्रवेश करतात. त्यामुळे श्वसनाचे आजार, हृदयरोग आणि अगदी कर्करोगाचाही धोका वाढतो. हे कण वाहनांचा धूर, कारखान्यांतील प्रदूषण, शेतीतील कचरा जाळणे इत्यादी कारणांमुळे निर्माण होतात.
WHO च्या माजी मुख्य वैज्ञानिक आणि भारत सरकारच्या सल्लागार सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितल्याप्रमाणे, भारताने वायू गुणवत्ता डेटाचे संकलन उत्तम प्रकारे केले असले, तरी आवश्यक ती कारवाई करण्यात अपयश आले आहे.