नवी दिल्ली: भारताचा गोल्डन बॉय म्हणून ओळखला जाणारा आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याला भारतीय प्रादेशिक लष्करात लेफ्टनंट कर्नल या मानद पदाने सन्मानित करण्यात आले आहे. संरक्षण मंत्रालयाने 14 मे रोजी अधिकृतपणे ही घोषणा केली असून 16 एप्रिलपासून ही नियुक्ती लागू होणार आहे.
नीरज चोप्राचा हा सन्मान केवळ त्याच्या क्रीडाक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी नाही, तर देशाप्रती असलेल्या निष्ठा आणि समर्पणासाठीही आहे. भालाफेक या खेळात जागतिक स्तरावर भारताचं नाव उंचावणाऱ्या नीरजने 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून इतिहास रचला होता. या ऐतिहासिक कामगिरीनंतर तो भारतातील प्रत्येक युवकाचा आदर्श बनला.
लेफ्टनंट कर्नल म्हणजे काय?
लेफ्टनंट कर्नल हे भारतीय लष्करामधील एक वरिष्ठ अधिकारी पद आहे. हे पद मेजरच्या वरचे आणि कर्नलच्या खालीले असते. लेफ्टनंट कर्नल हा एका बटालियनचा प्रमुख असतो, ज्यामध्ये सुमारे 600 ते 1000 सैनिक असतात. या पदावर असणारा अधिकारी केवळ लढाईतच नव्हे, तर प्रशासकीय आणि प्रशिक्षणाशी संबंधित जबाबदाऱ्या देखील पार पाडतो. हे पद साधारणतः सैन्यात प्रवेश केल्यानंतर 13 ते 14 वर्षांच्या सेवेनंतर दिले जाते, आणि यात उत्कृष्ट कामगिरी, नेतृत्वगुण व वरिष्ठ अधिकाऱ्यांची शिफारस यांचा विचार केला जातो. लष्करातील या पदाला मोठा सन्मान आणि जबाबदारी प्राप्त असते.
हेही वाचा: Operation Sindoor: भारतीय सैन्यदलाची धडाकेबाज कारवाई, 23 मिनिटांत पाकिस्तानचे 11 एअरबेस खाक
नीरज चोप्राने 2016 मध्ये नायब सुभेदार या पदावर भारतीय लष्करात प्रवेश केला होता. त्यानंतर 2018 मध्ये त्याला सुभेदारपदी पदोन्नती देण्यात आली. आता त्याच्या कर्तृत्वाची दखल घेत भारतीय लष्कराने त्याला लेफ्टनंट कर्नल या मानद पदाने गौरवले आहे.
हा सन्मान मिळवणाऱ्या खेळाडूंमध्ये नीरज आता एम.एस. धोनी, कपिल देव आणि अभिनव बिंद्रा यांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. या तिन्ही खेळाडूंनाही याआधी प्रादेशिक सैन्यात मानद पदव्या देण्यात आल्या होत्या. धोनीला 2011 मध्ये लेफ्टनंट कर्नल, कपिल देव यांना 2008 मध्ये आणि अभिनव बिंद्राला 2010 मध्ये ही मानद पदवी प्राप्त झाली होती.
नीरजने हा सन्मान मिळाल्यानंतर आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'ही फक्त मानद पदवी नसून माझ्यासाठी एक मोठी जबाबदारी आहे. भारतीय लष्कराचा भाग असणे हीच एक अभिमानाची गोष्ट आहे. मी देशाची सेवा केवळ मैदानावर नव्हे, तर सैन्याच्या माध्यमातूनही करत राहीन.'
हे नवे पर्व नीरजसाठी एक नवा अध्याय ठरेल, अशीच सर्वांची अपेक्षा आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी देशवासीयांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राष्ट्राभिमान आणि क्रीडा उत्कृष्टतेचा संगम म्हणजे नीरज चोप्रा.