मुंबई : महायुती सरकारचा शपथविधी गुरुवार 5 डिसेंबर रोजी होणार आहे. हा शपथविधी मुंबईत आझाद मैदान येथे होणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. महायुतीकडून तसेच राज्याच्या प्रशासनाकडून आझाद मैदानाची शपथविधीच्यादृष्टीने चाचपणी झाल्याचेही समजते.
दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची बैठक झाली. या बैठकीनंतर शुक्रवारीच महायुतीची मुंबईत बैठक होणार होती. पण एकनाथ शिंदे यांनी गावी जात असल्याचे जाहीर केले. यामुळे महायुतीची बैठक रद्द झाली. आता दिल्लीतून फोन आल्यानंतर महायुतीची एक किंवा दोन डिसेंबर रोजी बैठक होण्याची शक्यता आहे. याआधीच महायुतीकडून शपथविधीच्यादृष्टीने आझाद मैदानाची चाचपणी झाली.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या व्यतिरिक्त शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमधून प्रत्येकी एक जण उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची शक्यता आहे. प्रत्येकी सहा आमदारांमागे एक मंत्री या सूत्राने महायुतीमधील पक्षांना मंत्रिपदांचे वाटप होणार आहे; असेही सूत्रांकडून समजते. महायुतीच्या नियोजनानुसार गुरुवार 5 डिसेंबर रोजी पंधरा ते अठरा मंत्री शपथ घेतील, असेही समजते.
महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणुकीचा निकाल
- एकूण 288 जागा
- महायुती 230 जागांवर विजय
- भाजपा 132 जागांवर विजय
- शिवसेना 57 जागांवर विजय
- राष्ट्रवादी काँग्रेस 41 जागांवर विजय
- महाविकास आघाडी 46 जागांवर विजय
- उद्धव ठाकरे गट 20 जागांवर विजय
- काँग्रेस 16 जागांवर विजय
- शरद पवार गट 10 जागांवर विजय
- इतर 12 जागांवर विजय
जिंकून आलेल्या इतर बारा जणांपैकी पाच जणांनी भाजपाला तर तीन जणांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे भाजपाचे संख्याबळ 137 आणि शिवसेनेचे संख्याबळ 60 झाले आहे. महायुतीचे एकूण संख्याबळ 238 वर पोहोचले आहे.